CultureHinduismSpecial Day

दहशतवाद हा असाच संपवायचा असतो….

३६४ वा शिवप्रताप दिन,१० नोव्हेंबर १६५९

छत्रपती शिवाजी महाराज” या तीन अक्षरी मंत्रात अशी काही जादू आहे की, ते उच्चारताच अंगी रोमांच उभे राहतात. हे रोमांच उभे राहण्याचे कारण म्हणजे महाराजांनी केलेले पराक्रम. सैन्याला वा मावळ्यांना फक्त आदेश न देता , प्रत्यक्ष मैदानात उतरून लढणारा राजा. रयतेचा राजा , स्वराज्याचा राजा, असा राजा झाला नाही, या सम हाच.
महाराजांचं अवघं आयुष्य रोमांचकारी घटनांनी व्यापून राहिले आहे .त्या घटनांपैकी एक अत्यंत रोमांचकारी व काळाचाही थरकाप उडविणारी घटना, म्हणजे “अफजलखान वध” होय .तोच तो आमचा “शिवप्रताप दिन”. “दहशतवाद कसा संपवायचा असतो” याचे मूर्तिमंत उदाहरण आमच्या राजांनी आम्हाला घालून दिले आहे.
इंग्रजी कालगणनेनुसार १० नोव्हेंबर १६५९ आणि तिथीनुसार शके १५८१ ,मार्गशीष शुद्ध सप्तमी , विकारी नाम संवत्सर, गुरुवार . हा दिवस इतिहासाच्या पानांत सुवर्णाक्षरात कोरला गेला आहे. कारण आमच्या राजांनी रयतेची नासधूस करणारा , हिंदू स्त्रियांवर अत्याचार करणारा, मंदिरं फोडणारा ,गाई कापणारा, हिंदवी स्वराज्यावर संकटाचे वादळ घेऊन आलेला .”काफीरान” म्हणजेच काफीरांची (मुस्लिमेत्तर किंवा अल्लाला न मानणारे) कत्तल करणारा तसेच “शिक्नदा इ बूतान” म्हणजेच मूर्ती फोडणारा मूर्तिभंजक अशा बिरुदावली मिळवणारा, शिवरायांचे थोरले बंधू संभाजी यांचा कपटाने खून करणारा, दगाबाज, क्रूरकर्मा महाराष्ट्रात सरळ न येता दहशत माजवत महाराष्ट्राचे दैवत असलेले तुळजाभवानीचे मंदिर फोडणारा, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे नुकसान करतच वाईत आला.
महाराज नेहमीच शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि गनिमी काव्याने बलाढ्य शत्रूला नेस्तनाबूत करत आले आहेत. अफजलखान रुपी संकट महाराष्ट्राची अधिक नासधूस करण्याआधीच महाराजांनी दूरदृष्टीने आणि चातुर्याने अफजल खानाला गाफिल ठेवण्याचे मनसुबे आपल्या सहकाऱ्यांसह यशस्वी केले. आपण प्रचंड घाबरलेले आहोत , हे अफजलखानाच्या गळी उतरविण्यात यशस्वी होऊन, त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीसाठी खेचून आणण्यात यशस्वी झाले.
धुर्त अफझलखान भेटीत दगा करणार याची पूर्वकल्पना असल्याने ,महाराजांनी अंगात चिलखत व डोक्यात जिरेटोप घालून तसेच आपल्या अस्तनीत बिचवा तर बोटांमध्ये वाघनखं लपवली होती .जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांकडून योजनेची पूर्वतयारी करवून घेतली होती.
भेटीला येताच अंदाजाप्रमाणे खानाने शिवरायांना आलिंगन देतानाच त्यांची मान आपल्या काखेत दाबली व आपल्याकडील खंजिरीने शिवरायांच्या पाठीत वार केला पण चिलखतामुळे महाराज बचावले . पुढच्या क्षणी महाराजांनी अस्तनीतून बिचवा काढत खानाचे पोट चिरले व वाघनखांनी कोथळा बाहेर काढला.
दगा दगा असे खान ओरडताच, महाराजांवर चालून गेलेल्या सय्यद बंडाचा समशेरीसह हातच जीवा महालेनी चपळाईने खांद्यासह आपल्या दांडपट्ट्याने हवेतच भिरकावला . आपली आतडी सांभाळत पालखीतून पडण्याच्या बेतात असलेल्या खानाचे मग संभाजी कावजी आणि मस्तक धडा वेगळे केले.
महाराजांनी दगाबाज अफझलखानाचे शिर जिजाऊंच्या चरणी ठेवले. गंजी पेटल्या तोफा कडाडल्या आणि तिकडे दबा धरून बसलेल्या मावळ्यांनी खानाच्या सैन्याची दैना उडवली. साता समुद्रापार शिवरायांच्या शौर्याची व चातुर्याची महती पोचली. ती इतकी की , इंग्रज महाराज असेपर्यंत महाराष्ट्राकडे फिरकले सुद्धा नाहीत.

दहशतवाद हा असाच संपवायचा असतो हे महाराजांनी जगाला दाखवून दिले.

Back to top button