शास्त्रज्ञ ३
संरचनात्मक अभियांत्रिकीत गगनचुंबी कामगिरी करणारे जीएस रामस्वामी

२०२३ हे वर्ष एक-दोन नव्हे तर तब्बल २३ प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञांच्या(indian scientists) जन्मशताब्दीचे वर्ष आहे. चला तर मग भारतभूमीच्या या २३ विद्वान विज्ञानकर्मींची महती आजच्या आणि उद्याच्या पिढीला सांगूया…
वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या( Indian Academy of Sciences)संरचनात्मक अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे संस्थापक संचालक जी एस रामस्वामी यांनी भारतात या क्षेत्रातील संशोधनाची पायाभरणी केली. स्वातंत्र्योत्तर भारतातील अनेक स्मारके, उत्तुंग इमारती यांच्या संरचनात्मक जडणघडणीपासून काँक्रीट बांधकामात मजबुतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पिळदार पोलादी सळयांपर्यंत त्यांच्या संशोधनातील विविधता त्यांच्या सर्जक प्रतिभेचाच परिचय देते.
गुरुवयूर सुब्रह्मण्यन रामस्वामी( guruvayur subramanyam ramaswami) यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९२३ रोजी झाला. केरळातल्या (kerala) त्रिसूर येथे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर तत्कालिन मद्रासमधील गिंडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीतील पदवी प्राप्त केली. तेथून ते अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी गेले. तेथे कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी १९४८ साली एमएस आणि सीई या पदव्या मिळविल्या. भारतात परतल्यावर त्यांनी वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या संरचनात्मक अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून आपल्या संशोधनाचा ठसा उमटविला.

भारतात परतल्यावर सुरुवातीला काही काळ चिदंबरम येथील अन्नामलाई विद्यालयात अध्यापन केल्यानंतर त्यांनी रुरकी येथील सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून काम सुरू केले आणि अल्पावधीतच ते तेथे संरचना विभागाचे प्रमुख बनले. १९६५ मध्ये ते वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या (सीएसआयआर) संरचनात्मक अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (एसईआरसी) संस्थापक संचालक बनले. ही संस्था तेव्हा रुरकी येथेच होती. मात्र, १९७४ मध्ये तिचे मुख्यालय चेन्नई येथे हलविण्यात आले.
आपल्या प्रदीर्घ अध्यापन आणि व्यावसायिक कारकिर्दीमध्ये रामस्वामी यांनी अनेक नव्या अभिनव संरचना उभ्या केल्या आणि अभियांत्रिकी योजनाशाखात मोलाची भर घातली. छपरांसाठी परस्परांत अडकणाऱ्या आणि त्यातून संरचनात्मक मजबुती देणान्या पीकास्ट फनिक्युलर शेल्स, काँक्रिटमध्ये पिळदार त्यांनी काम केले. सळयांचा वापर हा त्यांच्याच संशोधनाचा परिपाक होता, जो आज फक्त भारतातच नव्हे तर जगभर अंगिकारला जात आहे. अशासारख्या अनेक शोधांमुळे त्यांचे नाव या क्षेत्रात जगभर आदराने घेतले जाते. एसईआरसीचे संचालक म्हणून संरचनात्मक अभियांत्रिकीमध्ये मुलभूत संशोधनाला चालना देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्याचप्रमाणे पल्लावरम येथील टॉवर टेस्टिंग स्टेशनच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा सहभाग होता.
स्वातंत्र्योत्तर भारतातील अनेक स्मारके तसेच गगनचुंबी इमारतींचे संकल्पन आणि संरचनात्मक आराखडे यांच्याशी संबंधित अनेक उच्चस्तरिय तज्ज्ञ समित्यांचे अध्यक्ष म्हणूनही रामस्वामी यांनी काम पाहिले. त्रिनिदाद, इराक, सौदि अरेबिया आदी देशांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे मुख्य तांत्रिक सल्लागार म्हणून तसेच, जमैका येथील वेस्टइंडीज विद्यापीठ, अमेरिकेतील फिनिक्स येथील अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी आदी विद्यापिठांमध्ये मानद प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले.
रामस्वामी यांनी अनेक पुस्तकेही लिहिली. ती संदर्भासाठी आजही सर्रास वापरली जातात. ‘अनॅलिसिस, डिझाइन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ स्पोस फ्रेम्स’, ‘प्रीस्ट्रेस्ड कॉंक्रिट डिझाइन’, ‘डिझाइन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ कॉंक्रीट शेल रूफ’ आदी त्यांची काही लोकप्रिय पुस्तके आहेत. या व्यतिरिक्त संरचनात्मक अभियांत्रिकीच्या विद्याथ्र्यांसाठी त्यांनी अनेक पाठ्यपुस्तकेही लिहिली.
रामस्वामी यांना साहित्य आणि ललितकलांमध्येही प्रचंड रस होता. ते सिद्धहस्त लेखक आणि उत्तम वक्ता होते. इंडियन मर्चंटस् चेंबरसारख्या प्रतिष्ठित संस्थेचा हिरकमहोत्सवी पुरस्कार, इन्व्हेन्शन प्रमोशन शिल्ड, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्सचा गॅमन पुरस्कार आदी सन्मान त्यांना प्राप्त झाले तसेच, बंगळुरू येथील इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सचे फेलो म्हणून त्यांची निवड झाली.
रामस्वामी यांचे निधन ९ मार्च २००२ रोजी झाले. त्यांच्या सन्मानार्थ संरचनात्मक अभियांत्रिकी संशोधन संस्थेने राष्ट्रीय स्तरावरील पाठ्यवृत्ती सुरू केली असून त्यांच्या जन्म- शताब्दीनिमित्त विशेष व्याख्यानमालिकेचेही आयोजन करण्यात आले आहे.
लेखक :- प्रा. ए रामचंद्रैय्या
(प्रा. ए रामचंद्र हे वरंगळ एनआयटीमध्ये प्राध्यापक असून विज्ञान प्रसारच्या स्कोप इन तेलुगु या प्रकल्पाचे समन्वयक आहेत.)
(साभार: डिसेंबर २०२२ च्या विज्ञान विश्व अंकात प्रसिद्ध झालेली लेखमाला)