HinduismNews

कृष्णदयार्णवकृत हरिवरदा या महाकाव्यातील तत्कालीन समाजदर्शन

प्रास्ताविक आणि पार्श्वभूमी

संत कृष्णदयार्णव (Krishna Dayarnav Charitra) (इ. स. १६७४ -१७४०) यांचा काळ, प्रचंड धामधुमीचा होता. लहानपणीच आईवडिल निवर्तले व त्याना मोगली आक्रमणांच्या धाकापायी मूळगाव कोपर्डे सोडून मराठवाड्यात स्थलांतर करावे लागले. पण तेथे गुरूंची भेट होऊन पुढील अभ्यास व साधनेची सुरुवात सुरुवात झाली. गुरूंबरोबर देशाटन केल्याने त्यांचे देशातल्या परिस्थितीचे, सूक्ष्म निरीक्षण होत गेले. एका महाव्याधीचा त्रास जडला, पण एकनाथांच्या दृष्टांतावरून भागवताच्या दशम स्कंधावर हरिवरदा ही महाकाव्यरूपी टीका आरंभ केली. ४९ वा अध्यायाबरोबर पूर्वार्ध संपल्यावर, तो त्रास दूर झाला. ४२००० ओव्याच्या या महाकाव्यात दयार्णवांच्या विद्वत्तेची, सूक्ष्म निरीक्षणाची व काव्यात मांडणी करण्याची, भाषाशैलीची उत्तम अशी साक्ष मिळते. कृष्णाचे चरित्र वर्णन करताना ते आपल्या काळातल्या समाजस्थितीचेही उत्तम दर्शन घडवितात. तेही फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपण त्याची काही उदाहरणे पाहणार आहोत.

हरिवरदातील तत्कालीन समाजदर्शनाचे स्वरूप

आपल्या काळातले अनेकविध समाजदर्शन घडविण्याचे कृष्णदयार्णवांचे सामर्थ्य विलक्षण आहे – वाखाणण्याजोगे आहे. हरिवरदातील हे समाजदर्शन म्हणजे कृष्णदयार्णवांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचे आणि ती आपल्या काव्यातून प्रत्ययकारी, मार्मिक शब्दांतून मांडण्याच्या सामर्थ्याचे दर्शनच आहे. नगररचना, आक्रमकांनी घातलेल्या धाडी, केलेली जाळपोळ व लुटालूट, आततायी प्रवृत्तीचे लोक, यांच्याविषयी त्यांनी वर्णन केले आहे. या समाजदर्शनात शिवाय, विविध प्रकारची फळे, वनस्पती, नानाविध खाद्यपदार्थांचे प्रकार, अनेकविध नातेसंबंध, अशा अनेक गोष्टींचे वर्णन त्यांनी आपल्या काव्यात केले आहे. कृष्णदयार्णवांचे समाजाचे आकलन व त्यातून व्यक्त होणारी त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती, अचूक नोंदणी करण्याचे सामर्थ्य या सगळ्या वैशिष्ट्यांचे आपल्याला दर्शन घडते. त्यांची उदाहरणे आपण या लेखात पाहणार आहोत.

अराजकता व तत्कालीन समाजस्थिती

संवेदनशील मनाच्या कृष्णदयार्णवांना परचक्राच्या भीतीने गाव सोडून जावे लागले होते. भारतभ्रमणामुळे त्यांनी अनेकविध अत्याचार, मायाबहिणींची अब्रू दिवसाढवळ्या लुटली जाणे, माजलेला अधर्म, धर्मांतर, मदिरा, मदिराक्षी यांचा प्रसार, वाढता व्यभिचार या सर्व पाहिलेल्या व अंतःकरण विदीर्ण करणाऱ्या घटना अशा गोष्टींचे, उल्लेख, त्यांनी त्यांचे लिखाण करताना, वर्णन करून, मन मोकळेपणाने त्यांनी, आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मूळ भागवतातली स्थिती वर्णन करतानाही आपल्या काळातल्या स्थितीचे प्रत्ययकारी वर्णन केले आहे. ‘राजेची मातृपितृघाती I तेथ प्रजांची कोण गती Iकोण करी न्यायनीती I अधःपाती अवघे II हरिवरदा १-९७३ II राज्यभोगविषयांसाठीँ I मातापितरें वधिती कपटी I बंधुसुहृदांचिया कोटी I स्वार्थासाठी मारिती‘II हरि. १-९६९ II यात औरंजेबाकडे स्पष्ट निर्देश केलेला दिसून येतो, ‘सदाचारिया जाचिती IIहरि. १-१६६II प्राणपोषक विषयलुब्ध I राज्यमदे जे मदांध I देहलोभें विधिनिषेध I कर्म विरुध्द न म्हणती II ऐसे राजे वर्त्तमानIयाहून कलिकाळी निर्घृणI करिती पिंडांचे पोषण I लज्जादूषण न गणिती‘ I I हरि. १-९६८, ७० I I ८-१७८ ते १८२ या ओव्यांत सामान्य लोकांवरील अत्याचारांचे विदारक वर्णन आहे. त्यातच ‘पथिकांची, कुलस्त्रियांची वस्त्रहरणे‘ असे उल्लेख आहेत. अत्याचारी मोगलांविषयी, ‘म्लेंच्छ, यवन‘ असे शब्द वापरून कवींनी आपली भावना ठिकठिकाणी व्यक्त केली आहे. उदाहरणादाखल अध्याय ५२ मधील ५८ ते ६७ या ओव्या जिज्ञासूंना पाहाता येतील.

ढोंगी गुरुबाजीचा धिक्कार

दयार्णवांच्या काळी गुरुपेक्षा गुरुबाजीचा सुळसुळाट असावा. त्यांनी गुरुकर्णधारणम् या शब्दावर लिहिताना त्यांनी भ्रष्ट, ढोंगी, दांभिक गुरुबाजीचे वाभाडे काढले आहेत जसे रामदास, तुकाराम यांनीही काढले आहेत. ते म्हणतात ‘वेषधारी शठ दाम्भिक I त्यासी गुरुत्वे सेविती मूर्ख‘ Iहरि. ८७-७८३ I किंवा ‘मुखें म्हणती हरिदास I केवल पोटार्थी हरदास‘ Iहरि, ८७-७८४ I योगमार्ग, कीर्तन, प्रवचन, धर्म – कर्म या सर्वांतील विकृतीवर त्यांनी कोरडे ओढले आहेत. ते म्हणतात ‘शिष्य करिती पोरे रांडा I संप्रदाये पाखंडबंडा I हरि. ८७-७८८ I गुरुनाडे जठरचाडे‘ I हरि. ८७-७९०I जवळजवळ ६२-६३ ओव्या त्यांनी गुरु-शिष्यांच्या अधःपतनावर लिहिल्या आहेत. ‘वैराग्य पालथे पडे‘ I हरि. ८७-८०६ I असेही त्यांनी कठोर शब्दात स्पष्टपणे म्हटले आहे. ८७-११९२ आणि ८७-१२२९ या ओव्यात अशा लोकांच्या भोगप्रवृत्तीचेही वर्णन कवींनी केले आहे. अशा लोकांनी गुरुत्वाला हिणकस कळा आणल्याचे त्यंनी पोटतिडिकेने सांगितले आहे. आजच्या काळातही अशी उदाहरणे सापडतात. अशा प्रवृत्तींमुळे अध्यात्म क्षेत्रातील अपप्रवृत्तींचे दर्शन कवींनी घडविले आहे.

दैनंदिन आचरणासाठी मार्गदर्शन

दुसऱ्या अध्यायाच्या ओवी क्र. ७८४ ते ८२८ व पुढच्याही काही इतर ओव्यात दैनंदिन जीवन कसे आहे व कसे असावे, स्वधर्माचरण कसे असावे, विशेषतः गृहस्थाश्रमी कसे वागावे याचे फार सुरेख दिग्दर्शन केले आहे. ते विस्तार भयास्तव येथे देता येत नाही. पण एक मात्र खरे की, ते आजच्या काळातही उपयुक्त आहे. जिज्ञासूंना मुळातूनच अभ्यासता येईल.

प्रातःकाळचे व्यवहार

चौथ्या अध्यायात उषःकाली राजाला जागविण्याचे वर्णन आहे. ‘भैरव भूपाळ बिलावल I बीभास रामकलि मंजूळ I लक्ष्मीलील जागविती‘ I I हरि. ४-३० I I त्यानंतरच्या अनेक ओव्यांमध्ये प्रातःकाळच्या व्यवहारांचे सुरेख वर्णन आहे. राजे, सामान्य लोक, व्यभिचारी, सकाळी कसे उठतात हे तेथे सांगितले आहे. रागांच्या नावांरून हे स्पष्ट होते की, गायन पध्दती व आळवले जाणारे राग आजच्यासारखेच कृष्णदयार्णवांच्या काळीही तसेच प्रचलित होते.

जन्मानंतरचे सोपस्कार

पाचव्या अध्यायातल्या, गोकुळातल्या जन्मोत्सवाच्या वर्णनात, जातकर्म, सोने उगाळून घालणे, स्त्रियांच्या वस्त्रप्रावरणांचे, दागदागिन्यांचे वर्णन हे सर्व समोर घडत असल्यासारखे आहे, त्यावरून हे सर्व कृष्णदयार्णवांच्या काळातही होत असले पाहिजे असे दिसते. त्याच अध्यायात, नंद कर भरून परत जात असताना वसुदेवाची भेट व वसुदेवाची सावध राहण्याची सूचना व त्या संदर्भात कवींनी सर्वांनाच आत्महितासाठी सावध राहण्याची केली आहे. ते म्हणतात ‘तेथींची अमूल्य शब्दरत्नें Iश्रवणी घेउनी हृदयीं यत्नें I सांठविजे अप्रयत्नें I सुलभ सामान्य न मानावीं I I सर्वांप्रती हेचि विनति I सावध असावे आत्महितीं I हृदयीं धरुनि भगवन्मूर्ति I निजविश्रांती साधावी‘ I I हरि. ५-२७१ व २७२ I I

समाजधारणेसाठी नीतिशिक्षण व उध्दारासाठी भक्ति

सहाव्या अध्यायात, अध्ययन व ज्ञान देणे, बलिष्ठांनी इतरांना, त्रास न देणे वगैरे नीतिनियम गोकुळातल्या गोष्टींच्या संदर्भात सांगितल्या असल्या तरी कवींच्या व आताच्याही काळात लागू होणारे व सार्वकालिक अशा स्वरूपाचेच आहेत.

आयुर्वेदिक उपचार व नामस्मरण भक्तीचे महत्त्व

कृष्णावर राक्षसींच्या विषाचा परिणाम होऊ नये म्हणून गोपिकांनी आयुर्वेदिक उपचार केल्याचे वर्णन पाहिले म्हणजे कृष्णदयार्णवांच्या काळातही उपचारपध्दती तशी होती असे अनुमान काढता येते. तेच नामस्मरण भक्तीच्या बाबतीतही म्हणता येईल.

नैसर्गिक आपत्ती

सातव्या अध्यायात कृष्णाने केलेल्या दैत्यनाशाच्या वर्णनात अनेक आपत्ती ओढवतात. त्यांच्या चित्रमय वर्णनात त्या काळच्या नैसर्गिक आपत्तींचाही उल्लेख येतो – तृणावर्त (तृण आवर्त), धूलिध्वांत (धुळीचा अंधकार), पवनचक्र (वावटळ), पांसुवृष्टी (धुळीचा वर्षाव), उत्प्लवन (उडणे) अशा अनेक अर्थवाहक शब्दांनी नैसर्गिक आपत्तींचे वर्णन केले आहे.

अनेक प्रकारची व्रतवैकल्ये

‘कृच्छ्रें तप्तकृच्छ्रें सांतपने Iप्राजपत्यें चांद्रायणे I मासोपवास घारणें पारणेंI हरिप्रीती‘ IIहरि. ७-३६४II या व अशा ३६३ ते ३८० या ओव्यांतून प्राचीन काळी आणि अर्थातच कवींच्या काळात पाळल्या जाणणाऱ्या व्रतवैकल्यांची माहिती दिली आहे.

माणसांची परीक्षा

हिरा, साधू, यति, शांत मनुष्य, भूमि, सत्कृत्य, भक्त, शत्रू, शील अशा गोष्टी कशा पारखाव्या, त्यासाठी कसोट्या नवव्या अध्यायात ओव्या ३५० ते ३५३ यांत सांगितल्या आहेत. त्यांच्या काळाप्रमाणे त्या आजही उपयुक्त आहेत.

मोहाने मातलेली माणसे व त्यातून सुटकेचे मार्ग

या विषयावर सुरेख ओव्या दहाव्या अध्यायात २६४ ते २६९ व ३३१ ते ४३७ अशा दिल्या आहेत, त्या अर्थातच कवींच्या व आजच्या काळालाही योग्यच आहेत.

मुलांनी खेळात लावलेला राधा-कृष्णाचा विवाह

अकराव्या अध्यायात मुलांचे खेळ वर्णन केले आहेत. खेळताना, मुलांनी, राधा-कृष्णाचा विवाह लावला आहे, त्याचे सुरेख वर्णन ओवी क्र. २०२ ते २१२ यात आले आहे. मूळ भागवतात, असा प्रसंग नसला तरी, आपल्याला तसा दृष्टांत झाल्याचे कवींनी नोंदवले आहे.

खेळांचे प्रकार व फळा फुलांचा शृंगार

बाराव्या अध्यायात मुलांच्या खेळांचे व फळाफुलांनी केलेल्या साजशृंगाचे वर्णन कवींनी केले आहे. ‘क्रीडा करित स्थळोस्थळीं I हतुतू हमाम हुमली I कोठें खेळती चेंडूफळी I बाळकेली अनेक‘I Iहरि. १२-५४ I I खेळात चेंडूफळी म्हणजे क्रिकेटचा उल्लेख आहे. कृष्णाच्याकाळीही कृष्णाने नदीतून चेंडू काढून दिल्याचा उल्लेख आहे. तेव्हा पूर्वीही आणि कृष्णदयार्णवांच्या काळातही आपल्याकडे मुले क्रिकेट खेळत होती असे दिसते.

मुले स्वतःला फळा फुलांनी शृंगारीत होती असेही वर्णन त्यापुढच्या ओव्यांत कवींनी केले आहे. पुढे तेराव्या अध्यायात वनभोजनाचे आणि त्याच्या पारमार्थिक अर्थाचेही विवेचन अप्रतिम असे आहे. (हरि. १३-१९१ ते २११). पुढे पंधराव्या अध्यायातही वनाचे वर्णन, सृष्टिशोभा, आणि गोपबालकांच्या क्रीडांचे सविस्तर वर्णन आहे. (हरि. १५-१५० ते २४५). पुढच्या सोळाव्या अध्यायात कालियामर्दन प्रसंगी कृष्णाने कालिया मस्तकावर केलेल्या नृत्याच्या निमित्ताने, त्यावेळी प्रचलित असलेले नृत्याचे प्रकार वर्णन केले आहेत. (हरि. १६-३३२ ते ३४७).

अठराव्या अध्यायातही गडी वाटून घेवून विविध खेळ खेळत असल्याचे वर्णन तपशीलवार केले आहे, त्यात आंधळी कोशिंबिर, विटीदांडू, विविध प्रकारचे चेंडूचे खेळ, चिंचोक्यांचे खेळ. कवड्यांचे खेळ, निबुटिंबू, वडाच्या झाडावर चढणे व उतरणे, जो जिंकेल त्याला आवळे, बोरे मिळणे, असे अनेक क्रीडा प्रकारांचे वेधक वर्णन आहे. (हरि, १८-१६९-१९६). हे सर्व प्रकार कृष्णदयार्णवांच्या काळात खेळले जात असणार म्हणून तर इतके सविस्तर व सुरेख वर्णन हरिवरदात कवींनी केले आहे.

राजाचे कर्तव्य

विसाव्या अध्यायात, जळचक्राचे वर्णन करताना (पाणी शोषून घेणे, पाऊस पाडून परत देणे वगैरे), राजाचे कर्तव्य – कर घेवून प्रजेचे संरक्षण, संवर्धन करणे वगैरे याचे वर्णन कले आहे. (हरि, २०-७२,७३).

नाना वृक्ष, नाना गंध

बाविसाव्या अध्यायात नाना प्रकारचे वृक्ष आणि गंधांचे वर्णन आहे. अर्थातच हे सर्व कृष्णदयार्णवांनी त्यांच्या काळात पाहिले, अनुभवलेले असणार. ‘हरिचंदन देवदारु । रक्तचंदन कृष्णागरु । कस्तुरी गोरोचन मलयागरू । आणि कर्पूर काश्मिर‘।।हरि. २२-३६।। असे ओवी ३६ पासून ५० पर्यंत अनेक वृक्ष, फळे, फुले, गंध यांचे सुरेख वर्णन केले आहे. शुध्द हिरे, सोने ठरविण्याच्या कसोट्याही वर्णन केल्या आहेत तसेच परोपकारी असण्यात मनुष्यजन्माची सार्थकता आहे हेही सांगितले आहे.

कर्म करणे व त्याला साहाय्य करणाऱ्याचा आदर करणे हे देवापेक्षाही श्रेष्ठ

चोविस ते सत्तावीस या अध्यायांत, इंद्राऐवजी गोवर्धन पर्वताची पूजा करा, हे सांगून व तसे करायला लावून, इंद्राच्या कोपापासून संरक्षण करून हेच सांगितले आहे की आपल्या आजुबाजूच्या निसर्गाचे रक्षण, संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा विषय आजच्या काळातही फारच महत्त्वाचा आहे. 

संसारात गुंतून न राहाता स्वतःच्या उध्दाराचा विचार

अठ्ठाविसाव्या अध्यायात, मृत्युलोकातल्या लोकाची स्थिती वर्णन करून, मग सांगितलेला ‘केवळ संसारात गुंतून राहू नये, स्वतःच्या उध्दारासाठी प्रयत्न करायाला हवेत’ हा उपदेश आजही महत्त्वाचा आहे.याच अध्यायात अगोदर योगशास्त्र व इतर साधनामार्गांचेही वर्णन केले आहे व ते शक्य नसणाऱ्यांनी भक्तीचा मार्ग स्वीकारावा हे सांगितले आहे.

रासक्रीडा व तिचा पारमार्थिक अर्थ

अध्याय २९ ते ३३ यांत रासक्रीडा तिचा पारमार्थिक अर्थ सांगितला आहे व पुढे जीवनमुक्त व अवतारांचे आचरण कसे वेगळे असते हेही सांगितले आहे. जिज्ञासूंना हे सर्व स्वतंत्रपणे अभ्यासता टेईल.

कृष्णाची यश मिळवूनही अलिप्त राहण्याची वृत्ती

चौतिसाव्या अध्यायात, कृष्णाची यश मिळवूनही, त्याच्या फळापासून अलिप्त राहण्याची वृत्ती वर्णन केली आहे, कवींनी अशा व्यक्ती त्यांच्या काळात पाहिल्या असणार म्हणून ते या मुद्द्याचा आवर्जून उल्लेख करीत आहेत. अशी वृत्ती आजही सर्वांनाच अनुकरणीय अशीच आहे.

गोपींचा समरसभाव व भाग्यमहिमा

पस्तीसाव्या अथ्यायात वरील विषयावर विवेचन आहे ते आपल्या सर्वंसाठीही अभ्यसनीय आहे. कृष्णदयार्णव या रचना करताना तसेच समरस झालेले दिसतात.

दैवाची निर्मिती व आज्ञापालन

छत्तिसाव्या अध्यायातील ‘आपल्या कर्मांनी आपण आपले दैव निर्माण करतो व त्याची फले भोगावीच लागतात’ हे कंसाच्या उदाहरणावरून सागितलेले सार्वकालीन सत्य सर्वांनी लक्षात घ्यावे असेच आहे. तसेच, अक्रूराने आज्ञापालन करीन हे म्हणणेही त्याच वर्गात मोडते.प्रारब्धयोगे भोग भोगतानाही भगवत्प्राप्तीसाठी प्रयत्न चालू राहावेत.

सदतिसाव्या अध्यायात वर सांगितलेल्या वस्तुस्थितीचा पुढचा भाग सांगितला आहे तोही लक्षात घेतला पाहिजे. कवी म्हणतात ‘इतुकी दयार्णवकृत प्रार्थना । भोगप्रारब्धयोगे जाणा । प्रयत्नें साधिजे भगवद्भजना । हे खूण मनामाजि धरिजे‘ ।।हरि.३७-२८८।।

नगररचना

एकेचाळिसाव्या अध्यायात कृष्ण व बलराम मथुरेत प्रवेश केल्यानंतर पायीच फिरत चालले आहेत व प्रशस्त रस्ते, भव्य प्रासाद, उद्याने वगैरै पाहात जात आहेत असे वर्णन आहे. असे कवींच्या काळात कोठेतरी असलेले, देशपर्यटनाचे वेळी, त्यांनी पाहिलेले असणार म्हणूनच वर्णन इतके सुरेख उतरले आहे.
शस्त्रागाराचे व आततायी माणसांचे वर्णन बेचाळीसाव्या अध्यायातील वर्णन त्या काळातल्या स्थितीचे असले तरी जिज्ञासूंसाठी आजही अभ्यासण्यासारखे आहे.
दोषनिवृत्तीसाठी उपचारविधी.

त्रेचाळीसाव्या अध्यायात. कंसाला मारण्यापूर्वी दोषनिवृत्तीसाठी काही  उपचार केल्याचे वर्णन आहे. कर्तव्य म्हणून कोणाचा वध करण्यापूर्वी असे काही करण्याची प्रथा कृष्णदयार्णवांच्या काळीही असावी असे वाटते.

कृष्णाचा अलिप्तपणा

चव्वेचाळीस व पंचेचाळीसाव्या अध्यायात, कंसवधानंतर कृष्णाने उग्रसेनाला राज्यावर बसविले व कृष्णाने वसुदेव-देवकीच्या पुत्राची भूमिका स्वीकारली. हा कृष्णाचा अलिप्तपणा वा फळ वा श्रेय स्वतःकडे न घेण्याचा गुण हा विशेषच आहे. कृष्णदयार्णवांच्या काळीही काही तो लोकांमध्ये तरी असावा. आज तर त्याची फारच आवश्यकता आहे. 

व्रतबंध, गुरुगृही शिक्षण व गुरुदक्षिणा

पंचेचाळीसाव्या अध्यायातल्या गोष्टी। पध्दती कृष्णदयार्णवांच्या काळी असाव्यातच, आजकाल गुरुगृही शिक्षण फारसे अस्तित्वात नाही व व्रतबंधही हळू हळू कमी होत आहेत.

देवळातल्या देवतांपेक्षा साधुजन तत्काळ पाप, ताप, दैन्य घालवितात

अठ्ठेचाळिसाव्या अध्यायात (हरि. ४८-३२,३) देवळातल्या देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी बरेच काही करावे लागते, पण साधुजन मात्र तत्काळ खेद घालवून आनंदमय करतात. कृष्णदयार्णवांची, गावाहून स्थलांतरानंतर गुरूंची भेट व आध्यात्मिक प्रगती, नंतर एकनाथांच्या दृष्टांतावरून, हरिवरदाची निर्मिती व पूर्वार्धानंतर रोगमुक्ती ही उदाहरणे आहेतच व आजही तसे अनुभव येतात.


नुसती साधुसंतांची भेटच नव्हे तर त्यांच्या हरिवरदासारख्या ग्रंथांचे पठणही तसा परिणाम घडवितात. साईबाबांकडे येऊन एक भक्त दीक्षा मागत होते. साईबाबांनी त्यांना ग्रंथांचे पठण करायला उद्युक्त केले. त्यांनी हरिवरदा व इतर काही पोथ्या वाचल्या व त्यांना साईबाबांकडून प्रसाद मिळाला (श्रीसाईलीला जानेवारी-फेब्रुवारी २०११). ह्या लेखाच्या लेखकाचे वडिल पत्नीच्या निधनानंतर उद्विग्न झाले होते, त्यांनी, त्यांच्या आईंना (लेखकाच्या आजींना) एकनाथी भागवत व हरिवरदा वाचून दाखविला व त्यांची उद्विग्नता जाऊन त्यांनी उभारी घेतली व पोथी रूपात असलेला हरिवरदा ग्रंथरूपात प्रसिध्द करण्याचे ठरवून, अनेक अडचणींवर मात करून, तो आठ खंडात प्रसिध्द केला. खुद्द लेखकालाही हरिवरदावर समीक्षा करणारे पुस्तक प्रकाशित करावयाचे होते व अनेक अडचणी समोर आल्या तेव्हा अचानक (कै) नाना देशपांडे (नाशिक) या संतांची भेट होऊन, त्याची मदतही मिळून ‘श्रीकृष्णदयार्णवामृत‘ हे पुस्तक, सुंदर स्वरूपात प्रकाशित झाले.

पूर्वार्धाची समाप्ती व आगळे पसायदान

एकोणपन्नासावा अध्याय हा पूर्वार्ध समाप्तीचा अध्याय, पुढे आपल्या हातून रचना होईल की नाही या शंकेने कवींनी या अध्यायाच्या शेवटी पसायदान घातले आहे (हरि. ४९-४७४ ते ४८५), ते सर्व मानवतेसाठीच पसायदान मागतात. या अध्यायात त्यांची व्यथा शमल्याचाही उल्लेख आहे (हरि, ४९-४५०).

सुंदर द्वारकानगरी

पन्नासाव्या अध्यायात ओवी ४४७ ते ५७४ द्वारका नगरीच्या नियोजनाचे, मंदिराचे, प्रासादांचे, व वैभवाचे सुंदर व सविस्तर वर्णन केले आहे. त्यात कृष्णदयार्णवांनी आपल्या देशपर्यटनात पाहून व आपल्या कल्पकतेचे मिश्रण त्यात करून, ती काव्यरचना केली असणे शक्य आहे.

रुक्मिणीहरण व विवाह

बावन्न, त्रेपन्न व चोपन्नाव्या अध्यायात, रुक्मिणीहरण व नंतरची युध्दे, द्वारकेत विवाह त्यावेळी शृंगारलेली द्वारकानगरी यांचे सविस्तर वर्णन आहे त्यातल्या काही भागात कृष्णदयार्णवांच्या काळातल्या अनुभवाचे।घटनांचे पडसाद काव्यात उमटलेले असू शकतात. जिज्ञासूंना ते पाहता येतील.

लोकोपचार

 सत्तावन्नाव्या अध्यायात कृष्णाने अवतार असून लोकोपचार केले, करायला लावले – मृत्यूनंतरचे विधी, सांत्वन करणे, ज्याचे धन त्याला परत करणे वगैरे लोकोपचाराकडे लक्ष दिल्याचे सविस्तर वर्णन आहे, कवींना हा विषय महत्त्वाचा वाटतो हे त्यावरून दिसून येते.

गृहस्थी जीवन

एकोणसाठ, साठ, एकसष्ट, एकोणसत्तर व सत्तर या अध्यायात गृहस्थी जीवनाचे तपशीलवार वर्णन आहे. मुळात नारद कुतूहलाने, कृष्ण सोळाहजार एकशे आठ स्त्रियांबरोबरचा संसार कसा करतो, ते पाहण्यासाठी येऊन ते पाहात जातो, असा विषय असला तरी आपण लेख विषयाच्या दृष्टीने कृष्णदयार्णवांनी त्यांच्या काळातल्या गृहस्थी जीवनाचे दर्शन त्यातून कसे घडवले आहे ते पाहणार आहोत.

पतीने केलेली थट्टा न समजल्याने ती रुष्ट होणे व पतीने समजूत काढणे या प्रसंगाचे वर्णन काही ओव्यात आहे (हरि. ६०-४३६, ४३७), काही घरात मुलांबरोबर खेळणे, काही घरात पुत्रपौत्रादि विवाहांचे सोहळे, कोठे द्यूतक्रीडा, कोठे पती-पत्नींचे संभाषण, कोठे पाहुण्याचे आगत स्वागत, कोठे बालकांचे कोडकौतुक, कोठे होमहवन, कोठे विप्रांचे पूजन, कोठे पतीला अभ्यंगस्नान, कोठे दानधर्म, कोठे अश्वारोहण करून – त्याचे शिक्षण देणे, कोठे शिकारीला जाणे, कोठे काही चर्चा, कोठे गोदान, कोठे पुराण ऐकणे, कोठे जलक्रीडा, कोठे कन्या, पुत्रांच्या विवाहाची बोलणी, कोठे कन्येचे माहेरपण, कोठे विहिरी, आश्रम, उपवने बांधण्याची आखणी चालू असणे, वगैरे वर्णने आहेत. या सर्व वर्णनांवरून आपल्या समाजातल्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाचे – ग़ृहस्थी जीवनाचे दर्शन, कृष्णदयार्णवांनी घडविले आहे. ते लक्षणीय आहे. गृहस्थाश्रम हा धर्म, अर्थ, काम यांचे साधन करून मोक्ष मिळविण्याचा मार्ग आहे हे स्पष्ट केले आहे.

आदर्श दिनचर्या

सत्तराव्या अध्यायात कृष्णाच्या निमित्ताने पुरुषाच्या आदर्श दिनचर्येचे – त्यात सेवकांचे सकाळच्या रागांचे गायन, प्रातर्विधीनंतर आसन, प्राणायाम, नंतर आत्मचिंतन, स्नानसंध्या, अग्नीला आहुती, गायत्री मंत्राचा जप, सूर्य व इतरांना अर्घ्य, गोदान, वस्त्रे व अलंकार धारण करणे, नंतर नियत कार्यासाठी बाहेर पडणे – असे दिनचर्येचे विवरण केले आहे. कृष्णदयार्णवांच्या काळी बऱ्याचशा प्रतिष्ठित लोकांची दिनचर्या अशी असावी असे वाटते.

उपसंहार

निरनिराळ्या अध्यायायांतील ओव्यांमधून कृष्णदयार्णवकालीन समाजस्थिती कशी होती हे दिसून येते, ते पाहण्याचा प्रयत्न आपण या लेखात केला आहे. वर उल्लेख न केलेल्या इतर अध्यायांमध्ये प्रामुख्याने कृष्णाचे पराक्रम व इतर चरित्र, भक्तीचे महत्त्व, तत्त्वज्ञानात्मक विश्लेषण आलेले आहे, त्यात कृष्णदयार्णवकालीन समाजस्थितीचे दर्शन घडण्यास फारसा वाव नाही, म्हणून हा लेख येथेच संपवूया.

लेखक :- डॉ. हेमचंद्र दयार्णव कोपर्डेकर,पुणे.

Back to top button