CultureHinduismNewsSpecial Day

महात्मा बसवेश्वर

आज अक्षयतृतीया (akshaya tritiya), आजच्याच पवित्र दिवशी भगवान शिवांच्या दोन शिवगणांचे पृथ्वीवर आगमन झाले.ते म्हणजे हिमवत्केदार पीठातील भगवत्पाद जगद्गुरु श्रीएकोरामाराध्य आणि जगत्ज्योती आद्य सामाजिक सुधारक महात्मा बसवेश्वर महात्मा बसवेश्वर(mahatma basweshwar) विवाहानंतर की विवाहपूर्वीच कूडलसंगम सोडून मंगळवेढ्याला गेले ,या चर्चेला फारसा अर्थ नाही. एक नक्की म.बसवेश्वरांचे परिपक्व व्यक्तिमत्व कुडलसंगमाच्या ज्ञानक्षेत्री परिपक्व होत होते. तेथील शांत – निवांत आणि समानतेला प्राधान्य देणारे वातावरण त्यांच्या चिंतन- मननशील वृत्तीला पोषक होते.

समता ,समरसता यांना पोषक आणि विषमतेचा कृतीशील निषेध करणाऱ्या नवसमाजनिर्मितीचे स्वप्न कसे साकार करायचे याचीच विवंचना म.बसवेश्वरांना लागली होती. मात्र मार्ग दाखविणारा शेवटी कूडलसंगम देवच आहे याची खात्री असल्यामुळे ते म्हणतात,

“मतिमंदनागि गतिय काणदे इद्देनय्य|
हुट्टु गुरुडन कैय्यकोलु कोट्टु नडिसुवंते नडिसय्य एन्न|
कुडलसंगमदेवा”( बसव वाणी ,पृ. 24)

“देवा विचारांच्या आर्वतात मी अडकलो आहे .माझ्या मंदबुद्धीला नेमका रस्ता सापडत नाही .प्रभू तुम्ही करुणाकर असल्यामुळे जन्मांधांच्या हाती काठी देऊन त्याला रस्ता दाखवता. मी तर तुमचाच भक्त आहे ना? योग्य मार्ग दाखवावा प्रभू मला”.प्रभू मला या जगाची उरफाटी रीत माहित आहे. हे लोक

“कल्ल नागर कंडरे हाल नेरे यंबरू|
दिटद नागर कंडरे कोल्लेंबरय्या |( तत्रैव ,पृष्ठ 41)

अर्थात हे लोक दगडी नागमूर्तीला दूधाचा अभिषेक करून त्याची पूजा अर्चना करतात. परंतु जिवंत नागाला मात्र ठार मारण्यासाठी धावतात. अशा उफराट्या ,आचार – विचार यामध्ये तफावत असणाऱ्या समाजात तत्व आणि आचरण यांचा मेळ घालायचा कसा ?याचे मार्गदर्शन कर शिवा.कूडलसंगमदेवा , मला इतरांचे दोष दाखवायचे नाहीत. मी देखील त्यांच्यातलाच एक आहे.

” मेरी करनी कुछ ,कथनी कुछ और ही है|
देखिये – नहीं है मन शुद्ध रंचमात्र भी|
करणी – कथनी में जहाँ मेल हो, रहेंगे वहीं
कूडलसंगमदेवा|- ( डॉ. भगवानदास तिवारी ,जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर,भक्तस्थळ, व.क्र. 30 पृष्ठ ,१५८)

म. बसवेश्वर आत्मशोध घेत होते.आत्मचिंतन करीत शिवाशी अनुसंधान साधित होते. चिंतनाच्या या अवस्थेत त्यांना संभ्रमावस्थेतला अर्जुन आणि त्याला मार्गदर्शन करणारी श्री भगवद्गीता आठवली. मित्रांच्या मेळाव्यात त्यांनी गीतेचीच साक्ष काढायला सुरुवात केली.सभोवताली जमलेले मित्र गीतेतील श्लोकामागून श्लोक सांगत होते. त्यांची भाबडी समजूत होती की असे करून आपण आपल्या या मित्राला मदतच करतो आहे.खरा ज्ञानी कोण , त्याचे कार्य काय असते याचे विवेचन करीत असताना अचानक म.बसवेश्वर उद्गारले,

“गीताव बल्लात जाणनल्ला|
मात बल्लात जाणनल्ला|
जाणनु जाण ,आत जाणनु|
लिंगव नेरेनंबिदात जाणनु|” ( बसववाणी, अविनाश लिमये, पृष्ठ 32)

मित्रांनो,’ भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली भगवद्गीता तोंडपाठ म्हणता आली म्हणजे आपण विद्वान झालो का? किंवा नित्य वेदपठण करतो म्हणून आपल्याला खरे ज्ञान प्राप्त झाले का? ही तर पोपटपंची आहे. भगवद्गीतेतील कर्मयोग जोपर्यंत आपल्या आचरणात येत नाही ,ज्ञानाला कृतीची जोड मिळत नाही ,तोपर्यंत हे पढीक पांडित्यच राहणार आहे.’

मित्रांनो मला आता जाणवते आहे की आपण उगाचच इकडे तिकडे भटकत होतो. संभ्रमित झालो होतो.ते बघा, कर्मयोग जाणणारे, समता ,न्याय ,बंधुता आणि मानवता ही लोकशाहीची तत्वे आपल्या आचरणातून सिद्ध करणारे माझे कूडलसंगमदेव मला, आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी आले आहेत.भ.शिवाच्या पाठोपाठ सद्गुरू कृपेमुळे आपण शिकलेले शैवदर्शन आणि या अमर मार्गावरील आपले मार्गदर्शक ‘ ‘आद्यपुरातन ‘ शिवसाधक अंत:चक्षु पुढे साकार होत आहेत.

नवसमाजनिर्मितीचे आपले स्वप्न पुढे न्यायचे असेल तर या पूर्वपरंपरेचा विचार करावाच लागणार आहे. ‘

म.बसवेश्वर आपल्या सोबत्यांना अनादी शिवतत्वाचे ,त्याची ओळख करून देणाऱ्या पंचाचार्य – आणि नायन्मार भक्तांचे स्वरूप सांगण्यात रंगून गेले होते. भगवान शिव: लोकशाहीचा जागर करणारे भ.शिव भक्ताच्या लिंग ,भाषा, प्रदेश आणि वर्ण जातींचा, त्याच्या सामाजिक स्थानाचा किंवा आर्थिक परिस्थितीचा विचार न करता ‘शिव शिव ‘म्हणत त्याला प्रेमाने जवळ घेतात. अजन्मा , अजर, अविनाशी असलेले हे स्वयंप्रकाशी आणि जगाचे कल्याण करणारे शिवतत्व केवळ भारतातच नव्हे तर जगभर लोकप्रिय आहेच. परंतु शिवांचे आणि हिंदू धर्मसंस्कृतीचे एक आविभाज्य, अंतरंग नाते आहे. त्यामुळेच हिंदू धर्मांतर्गत येणारे विविध संप्रदाय, मतप्रणाली शिवांपासूनच आपला आरंभबिंदू असल्याचे, तेच आपले आद्य गुरु असल्याचे सांगतात.

भारतातील सर्वात प्राचीन उपासना पद्धती म्हणजे शिवोपासना. ती क्वचितच प्रतिमा रुपात आणि अधिकांश शिवलिंग रूपात अर्थात स्थावर लिंग रूपात केली जाते. भारतभर विखुरलेली ज्योतिर्लिंगे, स्वयंभू लिंगस्थाने याबद्दल किती व काय सांगू ? ते तर तुम्हालाही माहित आहे. नितांत सुंदर अशा कूडलसंगमेश्वरादी स्थावरलिंगा बरोबरच वर्तुळाकार बाणलिंग ,साळुंकेसह असणारी शिवलिंगे, शिवयोग्यांनी कंठात धारण केलेली तेजस्वी इष्टलिंगे म.बसवेश्वरांच्या पुढे तरळत होती.

ते सांगत होते , ‘शिवलिंगाभोवती असणारी पीठीका अर्थात ‘शाळुंका’ म्हणजे शक्तीचे प्रतिक तर तिच्या मध्यभागी उभे असणारे लिंग हे शिवाचे प्रतिक होय.’ बहुतेक शिवोपासक या शिवशक्त्यात्मक स्थावर लिंगाची पूजा करतात ,उपासना करतात. रामेश्वरलिंगापासून अमरनाथ लिंगापर्यंत सारी स्थावरलिंग स्थाने डोळ्यासमोर आणा .’

कलासक्त म.बसवेश्वरांच्या डोळ्यापुढे प्राचीन काळापासून भारताच्या विविध भागात आढळणाऱ्या , कृपाप्रसाद देणाऱ्या वैशिष्टपूर्ण स्थावर लिंगस्थानांबरोबरच शिवाच्या विविध अवतारांचे चित्रण करणाऱ्या शिल्प प्रतिमा , रंगचित्रे, काष्ठशिल्प आणि शिवोपासनेशी संबंधित असणारी शिवचिन्हे तरळत होती .

ते सांगतच होते, ‘ मित्रांनो,’प्राचीन काळापासून शिवोपासनेतील सर्वात प्राचीन परंपरा म्हणजे आपली * इष्टलिंगधारक वीरशैवांची * परंपरा आहे.वीरशैव किंवा इष्टलिंग धारण केल्यामुळे ज्यांना लिंगायत असे म्हटले जाते .ते सारेच सांप्रदायिक या ‘ शक्तीविशिष्ट – शिवाची उपासना करतात आणि म्हणूनच त्यांच्या तत्त्वज्ञानाला ‘ शक्तीविशिष्टाद्वैत सिद्धान्त ‘ हे नाव रूढ आहे.( डॉ. चंद्रशेखर कपाळे ,शिवोपासना व वीरशैव संप्रदाय ,पृष्ठ 16)

ऋग्वेद काळापासून शिवोपासनेला प्राधान्य दिले आहे. ‘ पवित्रं ते विततं ब्रह्मणस्पते ‘या ऋग्वेदातील सूक्तात(९.८३) शिव हा ब्रह्मणस्पती असून त्याला सर्वांनी लिंगरूपाने धारण करावे असे म्हटले आहे . श्वेताश्वेतरोपनिषदात (4.10 )शिवशक्तीचे वर्णन ब्रह्माप्रमाणेच येते .तर स्कंद पुराणात

“आत्काश लिंगमित्याहु : पृथ्वी तस्य पीठिका |
आलय: सर्व देवांना लयनार्लिगमुच्यते || “

अर्थात अनंत आकाश लिंगस्वरूप असून पृथ्वी त्याचा आधार म्हणजेच पीठिका आहे. संपूर्ण ब्रह्मांड आणि सर्व देवता अंतिमतः या विशाल लिंगातच एकरूप( समाहित )होतात. म्हणूनच मला नेहमी वाटते ,

“जिथे जिथे पाहावे तिथे तिथे तुझी देवा ,
सकल विस्ताराचे रूप तूचि देवा
‘ विश्वतश्चक्षु’ तूचि देवा
‘ विश्वतोमुख ‘ तूचि देवा
‘ विश्वतोबाहु ‘ तूचि देवा
‘ विश्वतःपाद तूचि देवा ,
कुडलसंगमदेवा||”(बसव वचन, संपुट १,व.क्र.५३३)

जवळ असलेल्या मित्राने हे विश्वरूप ऐकून ‘ओम नमः शिवाय’ असा मंत्रघोष केला. साऱ्यांनी त्याच्या सुरात सूर मिसळले आणि सगळेजण म.बसवेश्वरांकडे कौतुकाने पाहू लागले. मित्रांची नजर आपल्यावर खिळलेली पाहून म.बसवेश्वर घाईघाईने म्हणाले , ‘अरे बाबांनो मी वेगळं का सांगतोय ? श्वेताश्वेतरोपनिषद आणि महानारायणोपनिषदाच्या मध्येही विश्वात्मक देवाची अशी स्तुती आली आहे ना?’

म.बसवेश्वर पुढे म्हणाले ,मित्रांनो भगवान शिवांचे हे विश्वव्यापक रूप लक्षात घेताना पुरुषसूक्त आठवले का? ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील ते ९० वे सूक्त. ‘आपल्याला दिसणारे जग हे विराट परमेश्वराचा अंशभाग आहे’ असे सूक्तरचेत्या नारायण ऋषींनी सांगितले आहे. भगवान विष्णूंच्या कृपाप्रसादासाठी हे सुक्त म्हणावे अशी श्रद्धा असली तरी भगवान विष्णू ही अंतिमतः शिवभक्तच ना ? त्यांनाही शिवाच्या आदी – अंत नसणाऱ्या विराट रूपाबद्दल परमश्रद्धा आहे.’ शिवाच्या विश्वरूपाबद्दल कोणालाही संदेह नव्हता. परंतु म.बसवेश्वरांसारख्या कट्टर शिवभक्ताने विश्वरूप साकार करताना पुरुषसुक्ताचा उल्लेख करावा हे तेथे जमलेल्या काही स्नेहीजनांना आवडले नाही. एकाने तर स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली.

त्यावेळी म. बसवांनी हसून म्हटले ,’ बंधू तुला माहीतच आहे की पुराणपरंपरेतील सर्वात मोठे पुराण म्हणून ‘स्कंद पुराणाचा’ उल्लेख केला जातो. भगवान स्कंद( शिवपुत्र कार्तिकेय) यांनी सांगितलेल्या या पुराणाचे लेखक महर्षी वेदव्यास आहेत. या पुराणाचे सात विभाग आहेत. त्यातील ‘माहेश्वर खंडात’ भगवान शिवांच्या स्थळ -लीळांचे तर वैष्णव खंडात भ.विष्णूंच्या स्थळ लीळांचे वर्णन केलेले आहे.

एकाच पुराणांमध्ये दोन भिन्न मानल्या जाणाऱ्या उपास्य दैवतांचे, त्यांच्याशी संबंधित घटनांचे वर्णन का येते याचा सूक्ष्म विचार मानवता धर्माचा जागर करण्यासाठी उत्सुक असलेल्या आपण करायलाच हवा. शैव-वैष्णव साधक , भक्तगण आपलेच दैवत श्रेष्ठ कसे हे हिरिरीने मांडतील.परंतु जातवेदमुनींचे आपण सारे शिष्य एका वेगळ्या विचाराने भारावलेले आहोत. आपले उद्दिष्ट वेगळे आहे. मानवता धर्माचा जागर करण्यासाठी उत्सुक असलेल्या आपण असा कोता विचार करून चालणार नाही.

मित्रा,’ भ.शिव हेच आपला अंतिम श्वास असणार आहेत. त्यांच्याशी सामरस्य साधणे आणि त्यांच्याशी एकनिष्ठ राहणे हे तर आपले जीवन आहे .इष्टलिंग दीक्षा घेतली, त्याच वेळी ‘ सतीपती ‘भावनेने आपण शिवव्रताचे करू असे आपण सद्गुरूंना वचन दिले आहे. बंधो, मला ते सगळे आठवते आहे. संप्रदायाप्रती एकनिष्ठा हे आपले कर्तव्य असले तरी तितकेच महत्त्वाचे कर्तव्य आहे, या समाजामध्ये एकोपा निर्माण करणे आणि त्यातून हे राष्ट्र एकात्म करणे . काल काश्मीर वरून आलेल्या यात्रेकरूचे बोलणे आपण ऐकत होतो ना? आपले सद्गुरु ही किती गंभीर झाले होते?आजुबाजूला परिस्थिती बदलते आहे. हिमालयाकडून, भारताच्या वायव्य भागाकडून परकीय आक्रमण सुरू झाली आहेत. याच्या बातम्या ऐकताना वाटले

माणसा – माणसांतील भेदभाव आपल्याला संपवायचे असतील तर सगळी माणसे त्या व्यापक ईश्वराचेच अंश आहेत हे लोकांना पटवून द्यावे लागणार.तसे असेल तर भ.शिव आणि भ. विष्णू यांच्यामध्ये भेद करून चालेल का? आपण आपल्या उपासनेवर दृढ आहोतच .जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत दृढही राहणार आहोत. प्रसंग मिळेल तेव्हा तेव्हा शिव हेच सर्वोत्तम हे देखील आपण इतरांना पटवून देणार आहोत. आपला ,आपल्या वीरशैव संप्रदायाचा विस्तार करणार आहोत. शिव हाच आपला अंतिम श्वास असणार आहे. पण त्याच वेळी राष्ट्रीय हित लक्षात घेऊन परकीयांपुढे शिव -विष्णू असा फरक करत आपल्यातील दरी वाढणार नाही ही दक्षता आपल्याला घ्यावीच लागणार आहे.

‘ शिवथोर विष्णू थोर | ऐसे भांडो भांडणार ||
आम्ही लागू त्या छंदा | व्यर्थ कोणी करेल निंदा|| (संत शिवदास)

ही आपली भूमिका असली पाहिजे. असे करण्यामागे असलेले सामंजस्य, समन्वयाचे सूत्र ‘विरोधहितं शैवम वीरशैवम विदुर्बुधा:’ मानणाऱ्या वीरशैवांनी लक्षात घ्यायला हवे. कोणताही धर्म, प्राणी यांचा द्वेष न करता वैरभावरहित होऊन उदात्त भावनेने सर्वांशी मिळून मिसळून वागण्याची शिकवण आपल्या श्री सिद्धांतशिखामणीने दिली आहे, ती कशी विसरता येईल?

लक्षात घ्या ,केवळ शिवपुराणतच नव्हे तर विष्णुपुराणातही ‘शिव माहात्म्य’ आले आहे. या विश्वव्यापक पुरुषाला नारायण म्हणा किंवा पर शिव म्हणा शेवटी ते माझ्या कूडल संगमदेवाचे स्वरूप आहे ना ! मग,

” समस्त वेदांच्या मस्तका- पलीकडे दहा अंगुले असे,
अशा अत्यतिष्ठद्दशांगुलाचे , वर्णन मी करावे कसे ?”- (ब.व.,सं.१,व.क्र.५३१)

असा प्रश्न उपस्थित करत त्या शिव परमात्म्याचा आकार हा अणुहूनही सूक्ष्म व त्याचवेळी विराटातिमविराटतम असल्याचे महात्मा बसवेश्वर सांगतात. शिव – विष्णूंच्या भक्तांमध्ये सुसंवाद ,समन्वय असेल तरच आपण हा समाज बदलण्याचे स्वप्न पुरे करू शकू हे लक्षात घ्या. स्कंद पुराण, केदार खंड, अध्याय आठमध्ये ,

“पीठिका विष्णुरुपं स्यात् लिंगरूपी महेश्वर: |
तस्मात् लिंगार्चनं श्रेष्ठं सर्वेषामपि वै द्विज: ||

असे नमूद करत भ.शिवविष्णूचे एकरुपत्व दाखवून समन्वयाचा केलेला प्रयत्न देखील लक्षात घ्यावा लागतो.’आपले म्हणणे सवंगड्यांना पटते आहे हे पाहून ते पुढे सांगू लागले, ‘ हिंदू तत्त्व कल्पनेनुसार परमतत्त्वाच्या निराकार रूपास ब्रह्म असे म्हणतात .’ओमिती ब्रह्म: ‘ (तैत्तिरीयोपनिषद१.८) अर्थात ओम हेच ब्रह्म आहे हे परब्रह्म ज्ञानेन्द्रिय ,कर्मेंद्रिय, रंग, आकृतीरहित असून ते नित्य, निराकार आणि सर्वव्यापक असते .जो साधक या निराकार ब्रह्माची उपासना करतो ,त्यालाच ज्ञानी म्हणतात .हीच भावना भागवत पुराण, भगवद्गीता (15.17) विष्णुपुराण,श्वेताश्वेतरोपनिषद,मुंडकोपनिषद ( 1.1.6 )मध्ये व्यक्त झालेली दिसते.’

व्यापक परब्रह्माच्या या कल्पनेचे रूप माझ्या कूडलसंगमदेवामध्येही पाहायला मिळते .म्हणूनच मी कूडलसंगम देवांना म्हणत कधी कधी म्हणत असतो,
” हे देवा तू गंगाधर ,गौरीश्‍वर, शंकर ,पंचमुख, दशभुज असलेला नंदीवाहक नाहीस. त्रिशूल ,खट्वांगधारी, ब्रह्मकपाल, विष्णूकंकाल दंड धरलेला, प्रलयकालीन रुद्रही नाहीस; तर निराकार, स्वयंभू लिंग म्हणूनच मी आपणास जाणले आहे , कूडलसंगमदेवा ! “(वचन सिद्धांतसार, व. क्र. 257, पृष्ठ 105)

अर्थात माझा कूडलसंगमदेव त्याच्या इच्छेप्रमाणे हजार मस्तके, हजार नेत्र ,हजार हात पाय असलेले रूप धारण करतो. म्हणूनच त्याच्या पायातून इंद्राचा, मनातून चंद्राचा ,कपाळातून अग्नीचा, मुखातून रुद्राचा तर भुजांमधून विष्णूचा आणि मांडीतून ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे .(तत्रैव ,व.क्र.७२,.पृ.३१-३२) हे विसरता येत नाही. आद्य भारतीय समाज सुधारक महात्मा बसवेश्वर या माझ्या आगामी ग्रंथातील काही भाग अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भगवत्पाद जगद्गुरु श्रीएकोरामाराध्य शिवाचार्य आणि जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या चरणी समर्पित करीत आहे..

लेखिका :- शमाताई घोणसे

Back to top button