ChristianityHinduismInternationalOpinionPoliticsकोकण प्रान्त

पोर्तुगालला माफी मागायचीच असेल तर ..

पोर्तुगालने( portugal) माफी मागितली पाहिजे आणि ट्रान्सअटलांटिक गुलाम व्यापारातील त्याच्या मागील भूमिकेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे वक्तव्य पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो डी सौसा Marcelo Rebelo de Sousa) यांनी केले आहे.

ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा, जे पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच युरोप दौऱ्यावर पोर्तुगालमध्ये आले होते, त्यांनी पोर्तुगीज संसदेला संबोधित केल्यानंतर रेबेलो डी सौसा यांनी हे वक्तव्य केले.

आश्यर्य म्हणजे पोर्तुगालच्या राष्ट्राध्यक्षांनी पोर्तुगीज राजसत्ता आणि कॅथलिक ख्रिश्चन धर्मसत्तेने हातात हात घालून भारताच्या गोवा दमण दीव या वसाहतीत ४६३ वर्षे धर्मप्रसारासाठी केलेल्या नृशंस हिंदू नरसंहाराबद्दल अवाक्षरही काढले नाही तर माफी दूरची गोष्ट राहिली .

पोर्तुगालने (portugal) मनापासून प्रामाणिकपणे भूतकाळातील आपल्या कृष्णकृत्यांबद्दल माफी मागायचे ठरवले असेल तर सर्वप्रथम त्यांनी भारतातील आपल्या ४६३ (१४९८ ते १९६१) वर्षांच्या काळयाकुट्ट कारकिर्दीतील धार्मिक अत्याचारांबद्दल संपूर्ण भारत देशाची जाहीर माफी मागावी.

https://www.indiatoday.in/world/story/portugal-national-apologise-role-slavery-trade-president-2364671-2023-04-26

गोवा, (goa) दमण आणि दीव या भारत वर्षाच्या तुलनेने छोट्या भूभागावर अनिर्बंध सत्ता गाजवणाऱ्या पोर्तुगीजांनी ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी( christian conversion) केलेल्या अमानुष कत्तली, हिंदू समाजाची फसवणूक करून केलेले घाऊक धर्मांतर, उध्वस्त केलेली शेकडो मंदिरे, हिंदू समाजाचा केलेला अनन्वित छळ श्री अनंत प्रियोळकर यांनी आपल्या The Goa Inquisition या १९६१ साली प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात पुराव्यासह मांडला आहे. आजही हे पुस्तक वाचताना डोळ्यात अश्रू उभे राहतात, हृदय गलबलते आणि अंगावर शहारे येतात. पोर्तुगीज राष्ट्राध्यक्षांची भावना प्रामाणिक असेल तर त्यांनी एका हातात हे The Goa Inquisition पुस्तक आणि दुसऱ्या हातात बायबल धरून अवघ्या भारताची जाहीर माफी मागावी.

कुंकळीच्या धर्मलढ्यात (१५८३) हिंदू समाजाच्या १५ प्रतिनिधींना किल्ल्यावर बोलवून विश्वासघाताने ठार मारल्याबद्दल पोर्तुगीज सरकारने समस्त हिंदू समाजाची याचनापूर्वक जाहीर माफी मागावी.

ओल्ड गोव्याचा हातकातरो खांब आजही भर रस्त्यात पोर्तुगीज कॅथलिक ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या हिंदू समाजावरील अनन्वित अत्याचारांची साक्ष देत उभा आहे. त्या खांबासमोर उभे राहून पोर्तुगीज सरकारच्या प्रतिनिधीने हात जोडून आणि नाक घासून अवघ्या हिंदू समाजाची माफी मागावी.

नार्वे येथील सप्तकोटेश्वराच्या देवळातील शिवलिंग फोडून ते गावातील विहिरीवर अशा ठिकाणी कॅथलिक मिशनऱ्यांनी (christian missionaries ) आडवे ठेवले की त्या श्री सप्तकोटेश्वरावर पाय दिल्याशिवाय विहिरीतले पाणी कोणी काढूच शकणार नाही. छत्रपती शिवरायांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. नुकताच गोवा सरकार तर्फे त्या मंदिराचा जिर्णोद्धार झालेला आहे. दिमाखाने उभ्या असलेल्या त्याच सप्तकोटेश्वराच्या समोर शिरसाष्टांग प्रणिपात घालून पोर्तुगीज सरकारच्या प्रतिनिधीने हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी.

येथे दिलेली उदाहरणे केवळ प्रातिनिधिक आहेत.. पोर्तुगीज राजवटीच्या इतिहासाचे थोडे अधिक अध्ययन केल्यास अशी शेकडो उदाहरणे दिसून येतात.

४६३ वर्षे आपल्या कॅथलिक धर्मप्रसारासाठी गोमंतकाच्या हिंदूंचा अनन्वित छळ करून संपूर्ण गोमांतक हिंदू विहीन करण्यासाठी पछाडलेल्या पोर्तुगीजांच्या राजसत्तेला गोमंतकाची एक चतुर्थांश लोकसंख्या देखील ख्रिश्चन करता आली नाही.

यावरून गोमंतकातील हिंदूंचे धर्मप्रेम आणि स्वधर्मासाठी त्यांनी केलेला अतुलनीय त्याग लक्षात येतो.आज ही गोव्याची ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या जेमतेम २५-२६ % आहे.

https://en.m.wikipedia.org/wiki/Goa

मानव वंशशास्त्राप्रमाणे २० वर्षांची एक पिढी समजली तर ४६३ वर्षांचा पोर्तुगीज शासन काल म्हणजे जवळपास २४ पिढ्या होतात. कॅथलिक धर्मप्रसारासाठी पोर्तुगीज राजसत्तेने २४ पिढ्या भारताच्या गोव्यातील हिंदू समाजाचा जीवघेणा छळ केला.

या २४ पिढ्यांच्या हिशोब या माफीने पुरता होणार नाही मात्र पोर्तुगीज शासनाला आपल्या भूतकाळातील कृष्णकृत्यांचा प्रामाणिक पश्चाताप झाला आहे याची खात्री जगाला पटेल व भविष्यात आपण असा धर्मवेडेपणा पुन्हा करणार नाही याची कदाचित ती ग्वाही असेल.

पोर्तुगाल सरकारला आपल्या पापाची नुकसान भरपाई करायची असेल तर गोव्यातील आपल्या ४६३ वर्षांच्या सत्ता काळात आमची हिंदू देवळे पाडून त्या जागी बांधलेल्या चर्चेस् ची यादी त्यांनी जाहीर करावी व ती चर्चेस् हिंदू समाजाकडे सन्मानाने सुपूर्त करावीत.

तसेच आपल्या पुराभिलेखातून (Archive) ज्या हिंदू कुटुंबांचे या प्रदीर्घ सत्ता काळात जबरदस्तीने अथवा फसवून धर्मांतर करण्यात आले होते, अशा सर्व कुटुंबांची माहिती प्रस्तुत करावी. जेणेकरून ज्या ख्रिश्चन( Christian) बांधवांची इच्छा असेल; त्या आमच्या बांधवांच्या “घरवापसी“चा अर्थात पुन्हा हिंदू धर्मात येण्याचा मार्ग प्रशस्त होईल.

आम्हाला माहीत असलेली पोर्तुगीज राजवट ही कडवट धर्मपिसाट, कॅथोलिक ख्रिश्चन धर्मांतरासाठी पाताळयंत्री योजना आखाणारी क्रूर आणि जुलमी अशीच होती.

पोर्तुगालच्या राष्ट्राध्यक्षांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या पापाचे परिमार्जन हे नुसत्या माफीने होणार नाही.. तर आमची पाडलेली देवळे परत करून व जबरदस्तीने वा फसवून धर्मांतरित केलेल्या हिंदू कुटुंबांचा तपशील जाहीर करूनच होईल.

अन्यथा पोर्तुगालच्या राष्ट्राध्यक्षांचा विलाप हे मगरीचे अश्रू आहेत असेच हा हिंदू समाज समजेल.

Back to top button