NewsRSSSeva

सेवा है यज्ञ कुंड..

RSS Help to Flood Victims

२३ सप्टेंबर ला धंतोली नागपूर (nagpur) येथील पंडीत मोहल्ला सेवा वस्तीतील पूरग्रस्तांना मदत.

रा.स्व.संघ (rss) गोरक्षण शाखेने केलेले सेवा कार्य पुढीलप्रमाणे..

रात्री 3-30 पासून सतत आकाश कोसळल्यासारखा ढगांचा गडगडाट, विजेचे लखलखणे आणि छतावर कोसळणाऱ्या पावसाच्या मुसळधार धारांचे थैमान सुरू होते. पहाटे पाऊस थोडा कमी झाला पण रस्त्यांच्या नद्या झाल्या होत्या. रीप रीप पावसात 7-15 वाजता शाखेत छत्र्या घेऊन पाच सहा स्वयंसेवक आले होते, शाखा गोरक्षण मंदिरात लावली होती. सकाळचा योग वर्ग झाला नव्हता आणि पावसाच्या गप्पा सुरू होत्या. यशवंत स्टेडियम जवळ राहणारा स्वयंसेवक सांगत होता की, पंचशील चौक पाण्यात असल्याने बर्डी वरून इकडे येणारी सगळी वाहतुक स्टेडियमला वळसा घालून त्याच्या गल्लीतून जात आहे. तसेच सोशल मीडियावर वर पाणी तुंबल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत होते. सगळ्यांनाच एकदम लक्षात आले की आपली पंडित मोहल्ला सेवावस्ती जलमय झालेली असेल. पटकन प्रार्थना घेतली. नंतर फोन खणाणू लागले. त्यातून समजले की कमरे इतक्या पाण्यातून नगराचे सेवा प्रमुख व आपल्या शाखेचे दोघेही सेवा गतिविधीचे कार्यकर्ते 7 वाजताच वस्तीत पोहोचले होते. त्यांना वस्ती पर्यंत जाताना कमरे इतक्या वाहत्या पाण्यातून जावे लागले होते. संपूर्ण वस्तीत सुमारे 4 फूट पाणी होते. आणि लवकरच आपले जे स्वयंसेवक त्या वस्तीत राहतात त्यांची भेट घेतली.

सर्व प्रथम त्या वस्तीतील लोकांना आपल्या कार्यकर्त्यांनी धीर दिला.

मग लक्षात आले की प्रथमत: वस्तीतील लहान लहान मुलांना तहान भूक लागलेली आहे भोजनाची व्यवस्था अगोदर करावी लागेल आणि वयस्क व रुग्णांना तेथून हलवावे लागेल. फोन खणाणू लागले आणि सकाळी 8-30 पर्यंत बिस्कीटांचे 100 पुडे व शुद्ध पाण्याच्या 200 बाटल्या वस्तीवर पोहोचल्या. जे वयस्क व आजारी होते अश्या 17 जणांना 9 वाजेपर्यंत अहिल्यादेवी मंदिरात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. त्यात बऱ्याच महिला होत्या. एका प्यारालेसिसच्या रुग्णाला स्ट्रेचर वरून न्यावे लागले.

एव्हाना पाणी ओसरू लागले होते घरातली तरणी ताठी माणसे घरातील पाणी बाहेर फेकून घरातल्या वस्तू सांभाळून पुन्हा लावण्याच्या कामी लागले होते. दोन घरी तर सापही आढळून आले. वस्ती जवळच चहाची व्यवस्था करण्यात आली पण कुठल्याही घरी स्वयंपाक होणे तर अजिबात शक्य नव्हते हे आगोदर ओळखून आपले दोन-तीन नगराची,भागाची जबाबदारी असलेले कार्यकर्ते, अंधविद्यालय व बी आर ए मुंडले स्कुल येथे मसाला भात तयार करण्याच्या कामात लागले. तेथे अनेक शाखांचे कार्यकर्ते पोहोचले होते. संघ दृष्टया असलेला अर्धा धरमपेठ भाग पाण्यात होता. सुमारे 12 सेवा वस्त्यांच्या भोजनाची व्यवस्था त्यांना करायची होती.

सकाळी 10-30 पर्यंत स्वयंपाक तयार होता. मग तिथून भर पावसात भोजनाचे वितरण सुरू झाले. गोरक्षण सायं शाखेचा चमू तेथे पोहोचला व भोजनाचे वितरणाचे कार्य सुरू झाले. सुमारे 350 घरी भोजन वितरित करण्यात आले.दुपारी आपले कार्यकर्ते संध्याकाळच्या शिध्याच्या कामात मग्न झाले आणि वस्तीत विजेचा प्रवाह सुरक्षितता म्हणून बंद केलेला असल्याने संध्याकाळीच 400 घरी भोजन वितरित करण्यात आले.

तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी 250 जणांचा नाश्ता पोहोचवण्यात आला. आरोग्याची समस्या उत्पन्न होणार म्हणून त्वरितच आपल्या संत गाडगे बाबा आरोग्य केंद्रातील औषधे सुमारे 150 घरातील रुग्णांना देण्यात आली.आता पुढील दोन दिवसात चादरी, सलवार-सूट,वह्या, पेन-पेन्सिली हे साहित्य अहिल्यादेवी मंदिरात जमा करून ते गरजून्ना वाटप करण्यात आले.

या सगळ्या मदत कार्यात काही गोष्टी नमूद कराव्यात अश्या आहेत.केवळ आपणच तेथे कार्य करत होतो असे नाही समाजातील अनेक व्यक्ती व संस्था मदतीला आल्या होत्या. आपण मदत मागितली आणि मिळाली नाही असे कुठेही झाले नाही. आपल्या प्रिय गोरक्षण सायंशाखेची पूर्ण, सुमारे 15 तरुण स्वयंसेवकांची चमू तेथे तैनात होती. त्यातील एक स्वयंसेवक तर स्वतःच्या घराची वाताहत झालेली असूनही मदत कार्यात हिरीरीने भाग घेत होता. आपल्याही गोरक्षण व्यवसाई प्रभात शाखेचे 15 स्वयंसेवक व समर्थ शाखेचे 5 स्वयंसेवक कुठल्याही सुचने शिवाय किंवा विनंती शिवाय स्वतः होऊन ह्या मदत कार्यात सहभागी झालेले होते. अश्या रीतीने प्रत्यक्ष मदत कार्यात 35 व अप्रत्यक्षपणे 20 स्वयंसेवक या मदतकार्यात सहभागी झालेले होते .

आपले त्या वस्तीतील नागरिकांशी पुर्वीचे संबंध आहेतच. परिणाम कसा होतो बघा, पावसाने घरांची वाताहत होत असताना एक नैराश्य वस्तीमधे पहाटे पसरलं होत पण आपल्या कार्यकर्त्यांना सकाळी 7 वाजताच आलेले बघूनच नैराश्य दूर झाले अशी प्रतिक्रिया कानावर आली.

परमेश्वराने आपली परीक्षा पहिली. परंतु ज्यांचे संसार उध्वस्त झालेत त्यांच्या चिंतेपुढे आणि दुःखापुढे आपली मदत काही फार नाही असे मला वाटते.

।। सेवा है यज्ञ कुंड, समिधासम हम जले ।।

https://marathi.abplive.com/videos/news/nagpur-rss-offers-helps-to-flood-victim-in-nagpur-marathi-news-1213045

Back to top button