NewsRSSSeva

पुण्याच्या जनकल्याण समितीतर्फे बहुविध रुग्ण सेवा भवन कार्यान्वित..

rashtriya swayamsevak sangh jankalyan samiti pune

डॉ. धनंजय केळकर यांच्या हस्ते सेवांचे उद्घाटन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या (Rashtriya swayamsevak sangh jankalyan samiti pune) ‘सेवा भवन’ या प्रकल्पातील सर्व सेवा कार्यान्वित करण्यात आल्या असून या सेवांचे उद्घाटन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक आणि विश्वस्त डॉ. धनंजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

जनकल्याण समिती आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी या संस्थांनी संयुक्तरीत्या सेवा भवन हा प्रकल्प उभा केला आहे. सेवा भवनमध्ये १८ रुग्ण क्षमतेचे जनकल्याण डायलिसिस केंद्र तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्व. डॉ. आनंदीबाई जोशी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्यवस्थेत ६४ जणांसाठी निवासाची व्यवस्था उपलब्ध असेल. प्रकल्पात रुग्ण आणि नातेवाईकांसाठी जनकल्याण स्वास्थ्य सल्ला, मार्गदर्शन, समुपदेशन केंद्रही सुरू करण्यात आले आहे. या सर्व सेवा अत्यल्प शुल्कात चालवल्या जाणार आहेत.

सेवा भवनमध्ये स्व. मुकुंदराव पणशीकर कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्रही कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यासाठी १३६ आसन क्षमतेचे सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त सभागृह बांधण्यात आले आहे.

सेवा भवनमधील जनकल्याण डायलिसिस केंद्राची पाहणी डॉ. धनंजय केळकर आणि डॉ. प्रवीण दबडघाव यांनी केली.

या सर्व सेवांचे उद्घाटन डॉ. धनंजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रुग्णसेवेच्या बाबतीत शासन, विश्वस्त संस्थांतर्फे चालवली जाणारी धर्मादाय रुग्णालये आणि समाज या तिन्ही घटकांवर मोठी जबाबदारी असल्याचे डॉ. केळकर म्हणाले. वैद्यकीय व्यवसायात चालणार्‍या कमिशन प्रॅक्टिसवर शासनाने कायद्याने बंदी आणणे आवश्यक असून वैद्यकीय शिक्षण आणि वैद्यकीय महाविद्यालये यांचा खर्च कमी झाला पाहिजे. ना नफा या तत्वावर चालणारी धर्मादाय रुग्णालये वाढली पाहिजेत. आरोग्य आणि शिक्षण या व्यवस्थांसाठी समाजाने जास्तीतजास्त पैसा निधीच्या रुपाने दिला पाहिजे, असे सांगून जनकल्याण समितीसारख्या सेवाकार्ये करणार्‍या संस्थांचे हात समाजाने बळकट केले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

समाजातील सज्जनशक्ती संघटित करून समाजासाठी उत्तम सेवाकार्ये चालवण्याचे जनकल्याण समिती हे आदर्श उदाहरण आहे, असे डॉ. दबडघाव म्हणाले. जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे यांनी प्रास्ताविक, कार्यवाह राजन गोऱ्हे आणि सहकोषाध्यक्ष चंदन कटारिया यांनी स्वागत व प्रकल्प कार्यवाह पलाश देवळणकर यांनी सूत्रसंचालन केले.

Back to top button