HinduismNews

हिंदू पठाण…

Hindu pathan

आपण हिंदू आहोत आणि पठाण आपला हा शब्द आपल्याला परिचित आहे. आपल्याला माहीत असलेला पठाण म्हणजे पश्तू भाषा बोलणारा अफगाणिस्तानातील पठाण वंशाचा मुसलमान. जास्तीत जास्त आमचे सामान्य ज्ञान सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान, ७०च्या दशकातील भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू सलीम दुर्राणी हा पठाण असल्याबद्दलचे, एकेकाळचा मुंबईचा कुख्यात डॉन करीम लाला हा देखील पठाण असल्याबद्दलचे किंवा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पठाण चित्रपटापुरते मर्यादित असते.

हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला ही देखील वंशाने पठाण होती हे सांगितले तर आश्चर्य वाटेल. पण “हिंदू पठाण” ही काय भानगड आहे हे आपल्या लक्षात येत नाही. नागपूरचे पश्तू भाषिक योगराज साहनी त्यांच्या “पठाण” या वंशाबद्दल बोलताना हिंदू हे विशेषण आवर्जून लावतात. “आम्ही पठाण आहोत. पण लक्षात ठेवा, आम्ही हिंदू पठाण आहोत” असे ते अभिमानाने सांगतात.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील कोहाट जिल्ह्यातील थाल आणि बन्नू भागात पाळेमुळे असणाऱ्या योगराजजी यांचे घर अफगाणिस्तान सीमेजवळ होते. तेथून काही अंतरावरच मिठाचे ढिगारे असायचे. त्यांच्याजवळ अविभाजित अर्थात अखंड भारताचा नकाशा आहे.

हिंदू पठाण हे १९४७च्या सुमारास मध्य भारतात स्थलांतरित झाले. नागराज हे नागपूरच्या काबडी चौकात राहतात. त्यांच्या घरात अफगाणी वेश परिधान केलेल्या त्यांच्या आजोबांचे-मणिराम यांचे छायाचित्र आहे. त्यांच्या हातात बंदुक आहे, तसेच त्यांच्या शेजारीच बंदुक घेतलेल्या जयराम यांचेही छायाचित्र आहे. हे कुटुंब फाळणीच्या आसपास मध्य भारतात स्थलांतरित झाले. येथे येताना त्यांनी त्यांचा सनातन धर्म तर सोबत आणलाच, शिवाय त्यांनी त्यांच्या मूळ गावाचे गुणधर्मही सोबत आणले. या छायाचित्रात दिसणाऱ्या ३ जणांचा अफगाणी टोळ्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या अफगाणी टोळीने बन्नू गावात हल्ला केला होता. मात्र त्यांना रोखताना, त्यांच्या गावाचे रक्षण करताना हे तिघे हुतात्मा झाले.

‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात बंदुकीची एक वेगळीच संस्कृती आहे. तेथील प्रत्येक हिंदू आणि मुस्लिम कुटुंबीय बंदुक बाळगतात,’ असे योगराज सांगतात. ‘पुरुषांकडे बंदूक नसेल तर त्यांना लग्नासाठी वधूच मिळणार नाही,’ असेही ते सांगतात.

मात्र इतक्या वर्षांत काय बदलले नसेल तर हिंदू पठाणांमध्ये दसरा साजरा करण्यासाठी लागणारा अतोनात उत्साह. ‘आम्ही उत्साहाने राम लीला बघतो आणि रावणदहनही मोठ्या आनंदाने करतो,’ असे ते सांगतात.वयाच्या ८व्या वर्षी हिंदुस्तानच्या फाळणीच्या वेळी भारतात आलेले योगीराज जी व त्यांचे कुटुंबीय यावर्षी ७२वा विजयादशमी आणि रावण दहनाचा सोहळा नागपुरात साजरा करणार आहेत.

hindu kush mountains

अफगाणिस्थानातील हिंदूकुश पर्वतरांगांच्या कुशीत राहणारे हे पश्तुन कोणी एकेकाळी सर्वथैव हिंदूच होते. इस्लामच्या आक्रमणात प्राणाच्या भीतीने म्हणा किंवा कोणत्यातरी लालसेने म्हणा, त्यांनी हिंदू धर्म सोडून इस्लामचा स्वीकार केला. मात्र इस्लामच्या चक्रीवादळात देखील काही नरवीरांनी आपला प्राणप्रिय हिंदू धर्म सोडला नाही आणि आपली भूमीही सोडली नाही. पुढील काळात पिढ्यान् पिढ्या तेथील इस्लामी राजवटीत आणि चहूकडून वेढलेल्या मुसलमानी सामाजिक वातावरणात देखील त्यांनी आपला प्राणप्रिय हिंदू धर्म सोडला नाही. त्या नरवीरांपैकी योगीराज सहानी यांचे पूर्वज होते.

मात्र आमच्या प्राणप्रिय मातृभूमीच्या विभाजनाने सर्वकाही बदलले. इस्लामच्या चक्रीवादळात ज्या हिंदू धर्म प्रेमी पठाणांनी धर्म परिवर्तन केले नाही व आपली भूमीही सोडली नाही, त्यांना विभाजनाच्या वेळी मात्र आपल्या मायभूमीपासून परागंदा व्हावे लागले. आजमितीस भारतात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र येथे हिंदू पठाण विखुरलेले आहेत. उत्तर प्रदेशा बुलंदशहर जिल्ह्यात तर यांची बारा गावे आहेत. त्यांना “बारा बस्ती” म्हणून ओळखले जाते. फाळणी नंतर भारतात हे पठाण हिंदू जिथे जिथे स्थिरावले तिथल्या हिंदू समाजाशी दुधात साखर विरघळावी तसे एकरूप झाले.

आपल्या पूर्वजांची भूमी सोडून निघताना काय वेदना झाल्या असतील त्या हिंदू पठाणांना.

“अखंड भारत” हीच या हिंदू पठाणांच्या वेदनेवारील एकमात्र रामबाण मात्रा आहे.

जसे आपल्याला अप्रूप वाटणारे “हिंदू पठाण”, तसेच अजून एक अप्रूप आहे “हिंदू रोहींग्या”… पण तो विषय पुढे कधीतरी.

Back to top button