HinduismNews

संत नामदेव – एका दृष्टिक्षेपात

sant namdev maharaj

भारताच्या सांस्कृतिक इतिहासात भक्ति परंपरेतील एक मध्यवर्ती व्यक्तिमत्त्व संत शिरोमणी नामदेव( namdev maharaj) होत. आधुनिक भारतातील मराठीच नव्हे तर हिंदी भाषक क्षेत्रांतील सार्वजनिक जीवनावरही संत नामदेव यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. उत्तर भारतात भक्ती चळवळीची संत परंपरा सुरू करणारे ते पहिले संत होत. संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वरांनी मिळून संपूर्ण देशाची यात्रा केली. देशभराची तीर्थयात्रा केल्यानंतर संत नामदेव पंजाबमध्ये आले आणि तिथे त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. पंजाबमधील संत नामदेवांचे कार्य एवढे महत्त्वाचे आहे, की पंजाबच्या संत परंपरेत त्यांना प्रथम संताचा मान दिला जातो.

त्यांनी पंजाबमध्ये २० वर्षे वास्तव्य केले. त्यांनी तिथेच देहत्याग केला, असा तेथील लोकांचा विश्वास आहे.अमृतसरपासून जवळच असलेल्या घुमाण येथे बाबा नामदेव किंवा भगत नामदेव यांचा गुरुद्वारा आजही उभा आहे. त्यांच्या शिष्यांना नामदेवियाँ असे म्हटले जाते.शिखांचा पवित्र अशा गुरु ग्रंथ साहिब यामध्ये त्यांचे ६१ पद आणि ३ श्लोक हे १८ रागांमध्ये संकलित आहेत. संत नामदेवांच्या दृष्टीने विट्ठल, शिव, विष्णू आणि पांडुरंग हे सर्व एकच आहेत. जातीचा विचार खोटा आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या प्रवेश द्वाराची पहिली पायरी ही संत नामदेवांच्या नावानेच प्रसिद्ध आहे, त्यांचा दृष्टिकोन अत्यंत व्यापक असून सर्व जीवांमध्ये एकच राम वसत आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.

संत नामदेव यांनी जातीपातींचा कटाक्षाने धिक्कार केला असून भक्तिभावनेला आवाहन केले आहे. रामनाम भजण्याचा त्यांनी उपदेश केला आहे :
• संत नामदेव हे सामाजिक कुप्रथा आणि जातिगत भेदभावाच्या विरुद्ध आहेत. प्रभू स्मरण हाच जीवनाचा आधार असल्याचे ते मानतात.
• श्री गुरु नानकदेव यांनी पंजाबच्या भूमीवर पुढच्या काळात जो उपदेश दिला त्यातील महत्त्वाचा भाग संत नामदेवांच्या तत्त्वज्ञानातूनच आलेला आहे.
• संत कबीर आणि संत रैदास अशा संतांनीसुद्धा नामदेवांचा महिमा वर्णन केला आहे.
• विट्ठलनामाचा जप करत करत ८०व्या वर्षी आषाढ कृष्ण त्रयोदशी संवत १२७२ मध्ये ते या भवसागराच्या पार गेले.
• वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे वारकरी संप्रदायाचा प्रचार केला.
• अर्धशतकाहून अधिक अशा भक्तिमय कालखंडात संत नामदेवांनी भारतभर अनेक पदयात्रा केल्या. दक्षिणेतील श्री शैलशिखर, अरुणाचलम, चिदंबरम्, विष्णुकांची, रामेश्वर आदी ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या होत्या.
• प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात.
• महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत लोकांना देश आणि देवभक्तीच्या एका सूत्रात बांधले. त्या अर्थाने ते राष्ट्रीय एकात्मतेचे आधुनिक प्रणेते ठरतात.
• संत नामदेवांचा देशभ्रमण काळ हा बहुतेक परकीय आक्रमकांचा होता. त्या आक्रमणाविरुद्ध स्वजागृतीचे काम त्यांनी आध्यात्मिक कृतींच्या माध्यमातून केले. एक प्रकारे निद्रीस्त समाजाला जागृत करण्याचे कामच त्यांनी केले.
• संत नामदेवांच्या कार्याला भक्तीमार्गापुरते मर्यादीत नाही. राष्ट्रीय एकात्मता आणि स्वत्व जागृती या संदर्भातही त्यांच्या कामाचे मोल होण्याची गरज आहे.

संत नामदेव;-

भारताच्या सांस्कृतिक इतिहासात भक्ति परंपरेतील एक मध्यवर्ती व्यक्तिमत्त्व म्हणजे संत शिरोमणी नामदेव. आधुनिक भारतातील मराठीच नव्हे तर हिंदी भाषक क्षेत्रांतील सार्वजनिक जीवनावरही संत नामदेव यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. प्रादेशिक वैशिष्ट्ये, राष्ट्रीयता आणि पंथनिरपेक्षता यांचे अद्भूत सामंजस्य त्यांच्या ठायी दिसून येते. भारतात धार्मिक परंपरांनी आपल्या गौरवशाली भूतकाळाचे जतन करण्यात किती महत्त्वाची भूमिका निभावली आहे, हे संत नामदेवांच्या चरित्रातून दिसून येते. म्हणून समाजाच्या सर्व थरांतून त्यांच्याबाबत भक्तिभाव आढळून येतो.

अल्पचरित्र..

संत नामदेव यांचा जन्म कार्तिक शुद्ध एकादशी विक्रम संवत १३२७ म्हणजेच इ. स. १२७७ मध्ये सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे झाला. दामाशेटी हे त्यांच्या वडिलांचे तर गोणाई हे आईचे नाव. नामदेवकृत म्हणून मानले जाणारे एक ‘आत्मचरित्र’ नामदेवांच्या संकलित गाथेत अंतर्भूत आहे. त्यात “गोणाई दामाशेटी झाले पाणिग्रहण । संसारी असोन नरसीगावी।।” असा निर्देश सापडतो. शिंपीकाम हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असला तरी संत नामदेवांचे मन त्यात रमत नसे. त्यांच्या कुटुंबात विठ्ठलभक्तीचे वातावरण होते. नामदेवांनाही लहानपणापासूनच विठ्ठलभक्तीची ओढ लागली. एकदा विठ्ठलासाठी नैवेद्य घेऊन देवळात गेलेले नामदेव देव नैवेद्य खाईना, म्हणून त्याच्या पायांवर डोके आपटून प्राण द्यावयास निघाले आणि भक्तवत्सल देवाने त्यांची ही भक्ती पाहून नैवेद्य आनंदाने खाल्ला, अशी आख्यायिका सांगितली जाते.

त्यांचा विवाह राजाई यांच्याशी झाला. त्यांना नारायण, महादेव, गोविंद आणि विठ्ठल असे चार पुत्र आणि लिंबाई नावाची मुलगी होती. मात्र त्यांचे मन केवळ विट्ठलाची भक्ती करण्यात लीन होई. दिवस-रात्र ते विठ्ठलाचे नामस्मरण करत असत. एक वेळ अशी आली, की नामदेवांचा प्रत्येक श्वास विठोबाच्या नावासरशी होत असे.

संत नामदेव हे २० वर्षांचे असताना संत ज्ञानेश्वर यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांची भेट घ्यायला स्वतः ज्ञानेश्वर पंढरपूरला आले होते. चंद्रभागा नदीच्या काठी त्यांचे भजन ऐकून ज्ञानेश्वर एवढे प्रभावित झाले की ते त्यांच्या सोबतीला थांबले. ते ज्ञानदेवादी संतांबरोबर तीर्थयात्रेला गेले. स्वतः नामदेवांनी वर्णन केल्याप्रमाणे –

नामयाचे भेटी ज्ञानदेव आले । लोटांगण घातलें नामदेवें ॥१॥
देऊनि आलिंगन प्रीती पडिभरें । पूजिलें आदरे यथाविधी ॥२॥

संत नामदेव हे परमेश्वराच्या सगुण स्वरूप विठ्ठलाचे उपासक होते, तर ज्ञानेश्वर हे निर्गुण रूपाचे. नामदेवांच्या दृष्टीने पंढरपूर सोडून जाणे हे मृत्यूसमान होते, मात्र ज्ञानेश्वरांनी खूप आग्रह केल्यामुळे सर्व संत मंडळींसोबत ते यात्रेला निघाले. औंढा नागनाथ येथील संत विसोबा यांना त्यांनी गुरू मानले. विसोबा खेचर यांनी त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार केला आणि सर्वव्यापी परमेश्वराचे ज्ञान त्यांना घडविले. त्यानंतर त्यांची विठ्ठलभक्ती सर्वव्यापक झाली.

पंजाबचा प्रवास;–

देशभर तीर्थयात्रा केल्यानंतर संत नामदेव पंजाबमध्ये आले आणि तिथे त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. झांज आणि एकतारी घेऊन ते मधुर स्वरात भजन गात असत. पंजाबमधील संत नामदेवांचे कार्य एवढे महत्त्वाचे आहे, की पंजाबच्या संत परंपरेत त्यांना प्रथम संताचा मान दिला जातो. त्यांनी पंजाबमध्ये २० वर्षे वास्तव्य केले. तेथील लोकांचा विश्वास आहे, की त्यांनी तिथेच देहत्याग केला. अमृतसरपासून जवळच असलेल्या घुमाण येथे बाबा नामदेव किंवा भगत नामदेव यांचा गुरुद्वारा आजही उभा आहे. त्यांच्या शिष्यांना नामदेवियाँ असे म्हटले जाते. इतकेच नाही तर शिखांचा पवित्र अशा गुरु ग्रंथ साहिब यामध्ये त्यांचे ६१ पद आणि ३ श्लोक हे १८ रागांमध्ये संकलित आहेत.

संत नामदेवांनी पंजाबमध्ये श्री गुरु नानकदेव यांच्या सुमारे २०० वर्षे आधी निर्गुण उपासनेचे प्रतिपादन केले. उत्तर भारतात भक्ति चळवळीची संत परंपरा सुरू करणारे ते पहिले संत होत.

संत नामदेवांचा संदेश

 • संत नामदेवांचे मन भक्तिभावनेने भजन करण्यातच रममाण होत असे. त्यांच्या दृष्टीने विट्ठल, शिव, विष्णू आणि पांडुरंग हे सर्व एकच आहेत. सर्व जीवांमध्ये एकच आत्मा आहे. त्यामुळे जातीचा विचार खोटा आहे.
 • पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या प्रवेश द्वाराची पहिली पायरी ही संत नामदेवांच्या नावानेच प्रसिद्ध आहे,
 • त्यांचा दृष्टिकोन अत्यंत व्यापक असून सर्व जीवांमध्ये एकच राम वसत आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
  एकल माटी कुंजर चींटी भाजन हैं बहु नाना रे॥
  असथावर जंगम कीट पतंगम घटि घटि रामु समाना रे॥
  एकल चिंता राखु अनंता अउर तजह सभ आसा रे॥
  प्रणवै नामा भए निहकामा को ठाकुरु को दासा रे॥ (श्री गुरु ग्रन्थसाहिब, पृ. ९८८)

  (अर्थ – एकाच मातीचे अनेक भांडे तयार होतात. त्याच प्रमाणे हत्ती आणि मुंगी हे एकाच तत्त्वापासून बनलेले आहेत. एका जागी स्थिर असलेल्या झाडांमध्ये तसेच दोन पायांवर चालणाऱ्यांमध्ये आणि कीटकांमध्येसुद्धा तोच प्रभू वसत आहे. त्या एक अनंत प्रभूवरच आशा केंद्रित करा आणि अन्य सर्व आशांचा त्याग करा. नामदेव विनंती करतात, की हे प्रभू ! आता मी निष्काम झाले आहे. त्यामुळे आता माझ्या दृष्टीने कोणीही मालक नाही किंवा कोणीही दास नाही म्हणजेच स्वामी आणि दास आता एकरूप झाले आहेत.’)
 • संत नामदेव यांनी जातीपातींचा कटाक्षाने धिक्कार केला असून भक्तिभावनेला आवाहन केले आहे. रामनाम भजण्याचा त्यांनी उपदेश केला आहे :
  नामाचा महिमा नेणेची पैं ब्रह्मा । म्हणोनियां कर्मा अनुसरला ॥१॥
  नाम हेंचि कर्म नाम हेंचि धर्म । केशव हेंचि वर्म सांगितलें ॥२॥
  नाम शुद्ध स्नान नाम शुद्ध संध्या । नामाविणें वेद आणिक नाहीं ॥३॥
  करितां आचमन केशव नारायण । करिती उच्चारण आधीं हेंचि ॥४॥
  लग्नाचिये काळीं म्हणती सावधान । लक्ष्मीनारायण चिंतन करा ॥५॥
  देहाचिये अंती प्रायश्चित्त देती । शेवटीं वदविती रामनाम ॥६॥
  ऐसिया नामापरतें नाहीं सार । गिरिजेसी शंकर उपदेशी ॥७॥
  करिती पितृश्राद्ध कर्म आचरती । शेवटीं म्हणती एको विष्णु ॥८॥
  नामें होय गति नामें होय मुक्ति । नामयाचे चित्तीं रामनाम ॥९॥
 • संत नामदेव हे सामाजिक कुप्रथा आणि जातिगत भेदभावाच्या विरुद्ध आहेत. प्रभू स्मरण हाच जीवनाचा आधार असल्याचे ते मानतात. रामाचा स्नेहच सर्व काही आहे.
 • संत नामदेवांनी भक्तांना बंधू म्हणून संबोधित केले असून रामनामाचा महीमा वर्णन केला आहे. रामनामासमोर सर्व जप-तप, यज्ञ, हवन, योग, तीर्थ, व्रत इत्यादी तुच्छ आहेत, नामजपाशी त्यांची तुलना केली जाऊ शकत नाही असे ते म्हणतात.
  नामें सदा शुद्धि प्राणिया होतसे । नामापाशीं असे भुक्तिमुक्ति ॥१॥
  नामा ऐसें सोपें नाहीं त्रिभुवनीं । नाम संजीवनी साधकांसी ॥२॥
  नामें भक्ति जोडे नामें कीर्ति वाढे । नामें सदा चढे मोक्ष हातां ॥३॥
  यज्ञ दान तप नामें आली हातां । नामें सर्व सत्ता प्राप्त होय ॥४॥
  नामा म्हणे सदा नाम ज्याचे मुखीं । नाहीं याच्या तुकीं दुजा कोणी ॥५॥
 • संत नामदेव हे आरंभी सगुण भक्तीसाठी ओळखले जात, मात्र पुढे चालून ते सगुण आणि निर्गुण यांच्यात समन्वय घडविणारे संत म्हणून ओळखले जाऊ लागले. श्रीकृष्णाच्या सुंदर सगुण स्वरूपाचे वर्णन त्यांनी आपल्या एका हिंदी भजनात केले आहे.
  धनि-धनि ओ राम बेन बाजै। मधुर मधर धनि अनहत गाजै ।।
  धनि-धनि मेघा रोमावली।। धनि-धनि क्रिसन ओढ़ें कांबली॥
  धनि-धनि तू माता देवकी। जिह ग्रिह रमईआ कवलापती॥
  धनि-धनि बनखण्ड बिंद्राबना। जह खेलै सी नाराइना॥
  बेनु बजावै गोधनु चरै। नामे का सुआमी आनन्द करै। (श्री गुरु ग्रन्थसाहिब,पृ. ९८८)

  (अर्थ – कृष्णाच्या मधुर स्वरांनी वाजणारी वंशी (बासरी) धन्य असल्याचे नामदेव म्हणतात. तीतून प्रकट होणारी असीम धूनसुद्धा मधुर आहे. कृष्णाने पांघरलेली कमली (घोंगडी) जिच्या रोमावली (केसांपासून) बनली आहे ती मेंढीसुद्धा धन्य आहे. देवकी माते! तू धन्य आहेस, तुझ्या घरी स्वतः कमलापतींनी (भगवान् विष्णू) अवतार घेतला आहे. जिथे भगवान् श्री कृष्ण (नारायण) खेळले आहेत ते वृंदावनातील वनसुद्धा धन्य आहेत. संत नामदेवांचा ईश्वर बासरी वाजवतो, गायी चरायला नेतो आणि आनंद घेतो.)
 • श्री गुरु नानकदेव यांनी पंजाबच्या भूमीवर पुढच्या काळात जो उपदेश दिला त्यातील महत्त्वाचा भाग संत नामदेवांच्या तत्त्वज्ञानातूनच आलेला आहे. श्री गुरु नानक देव यांच्या आधी २०० वर्षे संत नामदेवांनी पंजाबमध्ये शीख गुरूंच्या भक्ति-शक्ती जागृतीसाठी सामाजिक समन्वयाची व्यापक भूमिका तयार करून ठेवली होती.
  • संत नामदेवांनी मराठीत अभंग तसेच हिंदीत पदांची रचना केली.
 • संत कबीर आणि संत रैदास अशा संतांनीसुद्धा नामदेवांचा महिमा वर्णन केला आहे. भक्त रैदास म्हणतात –
  नामदेव कबीरु तिलोचनु सधना सैनु तरे।
  कहि रविदासु सुनहु रे संतहु हरि जीउ ते सभै सरै॥ (श्री गुरुग्रन्थ साहिब, पृ० ११७६)

  (अर्थ – नामदेव, कबीर, त्रिलोचन, सधना,सैन इत्यादी सर्व पार गेले आहेत. रविदास म्हणतात, की संतांनो, नीट ऐका, तो प्रभू काहीही करू शकतो.)
 • संत नामदेवांनी जातीभेदाचा तीव्र धिक्कार केला आहे. ते म्हणतात, तुळस कुश्चळ भूमीवर उगबळी तरी तिळा अमंगळ म्हणता येणार नाही –
  कुश्चळ भूमिवरी उगवली तुळसी। अपवित्र तयेसी म्हणों नये ॥
  काकविष्ठेमाजी जन्मे तो पिंपळ । तया अमंगळ म्हणों नये ॥
  दासीचिया पुत्रा राज्यपद आले । उपमा मागील देऊं नये ॥
  नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी। उपमा जातीची देऊ नये॥
 • आम्हां वैष्णवांचा कुळधर्म कुळींचा । विश्वास नामाचा सर्वभावें॥
  तरी त्याचे दास म्हणतां श्लाधिजे । निर्वासन कीजे चित्त आधीं॥
 • शिष्य आणि संप्रदाय
  संत नामदेवांच्या काळात नाथ आणि महानुभाव संप्रदायाचा महाराष्ट्रात प्रसार होता. याशिवाय विठोबाची उपासनाही प्रचलित होती. हीच उपासना दृढतेने चालविण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी सर्व संतांना एकत्र आणून वारकरी संप्रदायाचा पाया घातला. दरवर्षी लाखो वारकरी आषाढी और कार्तिकी एकादशीला विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला वारी करतात. ही प्रथा आजही प्रचलित आहे. याच संप्रदायातील प्रमुख संत म्हणून नामदेवांचे आगळे स्थान आहे. त्यांच्या अभंगाचे आजही महाराष्ट्रातील घराघरात भक्ती व आदराने गायन केले जाते. संत जनाबाई, संत विष्णुस्वामी, संत परिसा भागवत, संत चोखामेळा, त्रिलोचन इत्यादी त्यांचे प्रसिद्ध संत होत.
  समाधी
  संत नामदेवांच्या समाधी किंवा देहत्यागाबाबत दोन मतप्रवाह आहेत. एका मान्यतेनुसार, पंढरपुरातील विट्ठल मंदिराच्या महाद्वारावर त्यांनी समाधी घेतली. या जगात विट्ठलनामाचा जप करत करत ८०व्या वर्षी आषाढ कृष्ण त्रयोदशी संवत १२७२ मध्ये ते या भवसागराच्या पार गेले. दुसऱ्या मतानुसार, देशभर तीर्थाटन केल्यानंतर संत नामदेव पंजाबमध्ये आले. दोन दशके तिथे वारकरी संप्रदायाचा प्रचार करत राहिले आणि तिथेच घुमाण येथे त्यांनी देहत्याग केला. खरे तर नामदेवांचे जीवन आणि त्यांची वाणी ही भक्ती अमृताचा निरंतर वाहणारा झरा आहे. सनातन धर्माचे सहज स्वाभाविक पालन करत मानवतेला पावित्र्य प्रदान करण्याचे अद्भुत सामर्थ्य तीमध्ये आहे.

महाराष्ट्राबाहेरील कार्य:-

संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी शौरसेनी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजी की मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथांतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.
त्यांच्या कीर्तनांत अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.

वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे वारकरी संप्रदायाचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवांनी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णूस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी’ असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.

संत नामदेव गाथा या ग्रंथाच्या प्रस्तावनेत श्री. किसन महाराज साखरे लिहितात, “उत्तर हिंदुस्थानातील यात्रेत श्रीनामदेवरायांना हे कळून आले की, पंजाब हा परकीय आक्रमणाचा दरवाजा आहे. तेथे आक्रमक प्रथम धाड घालतात व भारतात शिरतात. वारंवारच्या स्वाऱ्यांनी त्या भूमीचा कण नि कण आधी तुडविला जाऊन तेथून ही धाड, भारताच्या इतर प्रदेशांत धुडगूस घालीत सुटते. परकीय स्वाऱ्यांच्या धाडींनी आणि राजकीय व धार्मिक आक्रमणांनी तेथील जनता हवालदिल झाली असून, तीत नैराश्य पसरले आहे. धर्माची भावना क्षीण होत चालली आहे, भीती निर्माण होऊन धैर्य खचत आहे. तेव्हा जो उंबरठा ओलांडून परकीय सैन्याचे हल्ले भारताच्या इतर प्रांतावर होतात, तेथेच तळ ठोकून तेथल्या लोकांची धर्मभावना व आत्मबल वाढविले पाहिजे, हा निर्णय श्रीनामदेवरायांनी घेतला हे स्पष्ट दिसते. तेथे त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. आभाळ फाटले असता मनुष्य त्याकडे पाहून परमेश्वराचा आधार मिळेल का म्हणून तिकडे डोळे लावतो. त्यांना उत्साह व धैर्य मातब्बर उद्धारक जो अवतरला ती श्रीनामदेवराय या रूपाने होय.”

राष्ट्रीय एकात्मतेचे आधुनिक प्रणेते..

संत ज्ञानेश्वरांचेच समकालीन असलेले आणि आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटविणारे संत नामदेव यांचे संत परंपरेत आगळे स्थान आहे. संत नामदेवांनी उभा भारत पायाखाली घालत प्रवास करून समाजप्रबोधन आणि जनजागृतीची व्यापक चळवळ उभी केली. त्यांनी भक्तिगीते आणि अभंगांची रचना करून आपल्या कृती तसेच आचरणातून समता आणि भक्तीची शिकवण दिली. एवढेच नाही तर महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत लोकांना देश आणि देवभक्तीच्या एका सूत्रात बांधले. त्या अर्थाने ते राष्ट्रीय एकात्मतेचे आधुनिक प्रणेते ठरतात.

अर्धशतकाहून अधिक अशा भक्तिमय कालखंडात संत नामदेवांनी भारतभर अनेक पदयात्रा केल्या. दक्षिणेतील श्री शैलशिखर, अरुणाचलम, चिदंबरम्, विष्णुकांची, रामेश्वर आदी ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. त्यांच्या प्रभावामुळे दक्षिणेतील दर्जी ही जात स्वतःला नामदेव म्हणवून घेऊ लागली, तर भूसागर आणि मल्ला ह्या जातींनी ‘नामदेव’ हे आपल्या जातीचे एक पर्यायी नाव म्हणून स्वीकारले. गुजरात, सौराष्ट्र, सिंधु प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि हिमाचल प्रदेश येथेही नामदेवांचे वास्तव्य झाले होते.

विशेषतः पंजाबातील त्यांच्या वास्तव्याची व कार्याची जाणीव आजही ठळकपणे मिळते. ‘नामदेवजी की मुखबानी’ म्हणून प्रसिद्ध असलेली नामदेवांची हिंदी भाषेतील ६१ पदे शिखांच्या ग्रंथसाहिब या धर्मग्रंथात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. नामदेवांची सुमारे सव्वाशे हिंदी पदेही आता उपलब्ध आहेत. विष्णुस्वामी, बहोरदास किंवा बोहरदास, जाल्लो, लध्धा, केसो कलंधर किंवा कलधारी ह्यांसारखे अनेक शिष्य नामदेवांना पंजाबात मिळाले. त्यांपैकी जाल्लो किंवा जाल्हण सुतारासारखे काही शिष्य नामदेवांसोबत पंढरपूरला आले. केसो कलधारी ह्याने भावलपूर संस्थानात वारकरी संप्रदायाची ध्वजा फडकविली. तेथे ‘कलधारिकी गद्दी’ ह्या नावाने प्रसिद्ध असलेला त्याचा आश्रम तसेच समाधीही आहे.

गुरदासपूर जिल्ह्यातील घुमाण गावी असलेले मंदिर (गुरुद्वारा बाबा नामदेवजी) प्रसिद्ध आहे. नामदेवांचे शिष्य बोहरदास यांनी हे मंदिर उभारले, असे म्हणतात. काही वर्षांपूर्वी तेथे मराठी साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा संत नामदेवांचा तिथे किती प्रभाव आहे, हे दिसून आले होते. प्रतिवर्षी माघ शुद्ध द्वितीयेस येथे मोठी यात्रा भरते. राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही नामदेवांची मंदिरे आहेत. उत्तरेतील रैदास (रविदास किंवा रोहिदास), धना, रज्ज.ब, तुलसीदास, पीपा, रामानंद, कबीर या संतांनी नामदेवांचा आदराने उल्लेख केलेला आहे. प्रसिद्ध गुजराती संत नरसी मेहतांनीही आपल्या काव्यातून नामदेवांचा निर्देश अनेकदा केलेला आहे. संत मीराबाईंनी आपल्या एका कवनात देवाने नामदेवांच्या घराचे छप्पर शाकारले, असा उल्लेख केला आहे.

संत नामदेवांचा देशभ्रमण काळ हा बहुतेक परकीय आक्रमकांचा होता. त्या आक्रमणाविरुद्ध स्वजागृतीचे काम त्यांनी आध्यात्मिक कृतींच्या माध्यमातून केले. एक प्रकारे निद्रीस्त समाजाला जागृत करण्याचे कामच त्यांनी केले. पुढे महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये परकीय राजवटींविरुद्ध यशस्वी लढे उभारले गेले, हे येथे उल्लेखनीय. म्हणूनच संत नामदेवांच्या कार्याला भक्तीमार्गापुरते मर्यादीत करणे योग्य ठरणार नाही. राष्ट्रीय एकात्मता आणि स्वत्व जागृती या संदर्भातही त्यांच्या कामाचे मोल होण्याची गरज आहे.

नामदेवकृत तत्कालीन परिस्थितीचे वर्णन

संत नामदेवांच्या काळात देशात परकीयांचे राज्य होते. तो काळ आक्रमणाचा होता. सर्वच संतांप्रमाणे नामदेवांनीही या परिस्थितीचे वर्णन केले आहे. मात्र त्या वर्णनाला त्यांनी आपल्या भक्तीच्या आणि इष्टदेवतेच्या रंगांत रंगविले आहे. उदा.
आकाशी वाणी होय सांगे सकळांसी । तळमळ मानसीं करू नका ॥ १ ॥
पापी जे अभक्त दैत्य ते माजले। धरणीसी जाले ओझें त्यांचें।।
दिधलासे त्रास ऋषि मुनि सर्वां। न पूजिती देवा कोणी एक।।
राहियेले यज्ञ मोडिलें कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्यां भेणें ॥ ३ ॥
वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशीं जाय । नेत्रीं वाहे तोय सांगतसे ॥ ४ ॥
बुडविला धर्म अधर्म जाला फार सोसवेना भार मज आतां ॥ ५ ॥

परधर्मी आक्रमकांचा अत्याचार अनावर झाला असताना देव परत या भूमीवर अवतार घेणार आहे, हे सांगताना ते म्हणतात,
आकाशी वाणी होय सांगे सकळांसी । तळमळ मानसीं करू नका ॥ १ ॥
देवकीच्या गर्भा येईल भगवान । रक्षील ब्राह्मण गाई भक्त ॥ २ ॥
उतरील भार मारील दैत्यांसी । आनंद सर्वांसी करील तो ॥ ३ ॥
रोहिणी उदरीं शेष बळिभद्र। यादव समग्र व्हारे तुम्ही ॥ ४ ॥
ऐकोनियां ऐसे आनंद मानसीं । येती स्वस्थळासी नामा म्हणे ॥ ५ ॥

संदर्भ :
१. संत नामदेव, डॉ. हेमंत विष्णू इनामदार आणि श्री. जयंत टिळक, केसरी मुद्रणालय, पुणे
२. संत नामदेवांची गाथा (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई १९७०)
३. श्री. किसन महाराज साखरे कृत प्रस्तावना, संत नामदेव गाथा (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई १९७०)

Back to top button