HinduismNews

जिजाऊंचे “राजकारण”..

jijau and shivaji maharaj

भारत पुनरुत्थानाच्या इतिहास पटलावर ज्या स्त्री-व्यक्तिमत्वांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे त्यात अग्रभागी असणारे नाव आहे.. राजमाता जिजाऊ ( Jijabai) !

ज्या काळात भरतखंडात सर्वत्र पराजित आणि निःसत्व वातावरण निर्माण झाले होते, पारतंत्र्य, गुलामीबद्दल कुणाला तिटकारा वाटत नव्हता… तेव्हा जिजाऊंनी हिंदवी स्वराज्य विचाराचा पुरस्कार केला! जेव्हा समाज बलहीन, सत्वहीन आणि तेजोहीन झाला होता तेव्हा जिजाऊंनी प्रयत्नांची कास धरली, सर्व सामन्यांचा स्वाभिमान जागा केला!

केवळ महाराष्ट्राचीच नाही तर संपूर्ण भरतवर्षाची शोककथा पाहून अस्वस्थ झालेली मूर्तिमंत सौदामिनी म्हणजे जिजाऊ! ती एक अत्यंत शूर पुरुषाची पत्नी होती, महत्वाकांक्षी होती पण अविवेकी नव्हती.सोनोपंत डबीर, नारोपंत मुजुमदार, बाळकृष्ण पंत हणमंते, ह्यांच्या कडून राजकारणातील गुंतागुंतीची उकल त्या शिकत होत्या. शिवनेरीवर बसून त्या कर्तबगार पतीचे राजकारण समजत होत्या, जगदंबेला विनवीत होत्या-

दे अंबिके, दे चंडिके, दे शारदे वरदान दे !
धर्मभू रक्षिण्या समर्थ असा शिवांश दे !!

शिवरायांसारखा राजा घडविणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ह्यांतून त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व स्पष्ट जाणवते. पैकी राजकारणाच्या उत्तम जाणकार जिजाऊंच्या संदर्भात अजून जाणून घेऊ या…

१) जिजाऊंच्या लग्नानंतर वडिल लखोजी जाधव व चार भाऊ व चुलते या सगळ्यांना निजामाने भर दरबारात ठार केले तेव्हा जिजाऊंनी आपली आई म्हाळसाराणी आणि वहिनींना सती जाण्याच्या समाजमनात रूढ झालेल्या कुप्रथेपासून परावृत्त केले कारण स्वराज्य उभे करण्यासाठी जसे लढवय्ये शूर योद्धे हवे तसेच ह्या शूर योद्ध्यांना मानसिक बळ देणारी आणि तशीच खंबीर नवीन पीढी तयार करणारी स्त्री शक्ती हवी हा दूरगामी विचार त्यांनी केला.

२) आदिलशहाने जिंजीच्या मोहिमेवर गेलेल्या शहाजीराजांना किल्लोर येथे आचानक झडप घालून कैद केले, त्याच वेळी, संभाजी व शिवाजी राजे यांच्यावर पण आक्रमण केले. जिजाऊंसाठी आणिबाणीचा व सत्वपरीक्षेचा काळ होता पण त्यांनी अत्यंत राजकारणी धोरणाने काही निर्णय घेतले.संभाजी राजांवर बंगळूर मध्ये फर्याद खान तर शिवाजीराजांवर फतेखान चालून आले. शिवाजी राजांनी सुभानमंगळ व शिरवड गड हारल्याची हूल देऊन फतेह खानावर त्याच्याच शस्त्रांनी हल्ला केला व त्याचा बिमोड केला व नंतर आपले हरलेले गड जिंकले तर संभाजीराजांनी स्थानिक संगठीत हिंदूच्या मदतीने प्रयत्न करून फर्याद खानचा धुव्वा उडविला. असे दोन्ही कडून तडाखे बसल्यावर आदिलशहाने शहाजीराजांना बढती देऊन सोडविले. शहाजी, संभाजी, व शिवाजी अशी स्वराज्यपोषक सत्ता केंद्रे जिजाऊ साहेबांनी तयार केली जेणे करून एका केंद्रावर हल्ला झाला तरी बाकी केंद्रे मदत करतील व हिंदवी साम्राज्य वाढते राहिल. माँ जिजाऊ ह्या नेहमीच शहाजी राज्यांच्या मेंदू होत्या व शिवाजी राजांच्या शक्ती, बुद्धी, प्रेरणा होत्या.

3) जिजाऊंच्या राजकारणी ज्ञानामुळेच त्यांनी शिवाजी राजांची ८ लग्नं लावून दिली जेणे करून झालेल्या सोयरीकीतून, स्वराज्याला बळ मिळेल पण तेच त्यांनी संभाजीराजांच्या बाबतीत केलं नाही कारण तोवर शिवरायांच्या नेतृत्वाखाली ‘स्वराज्य’ दृढ झाले होते.

४) महाराजांच्या यशाच्या खऱ्या सूत्रधार, जिजाऊसाहेब होत्या त्यांच्या राजनैतिक ज्ञानामुळेच त्यांनी राजांना .. शाहिस्तेखानाला लालमहालातच गाठणं, अफजल खानाला जावळीच्या जंगलात आणणं- त्याचं सैन्य मात्र स्वराज्याच्या सीमेवर अडविणं.. असे अनेक सल्ले दिले.पत्रांद्वारे ही जिजाऊंनी राजांना राजनैतिक उपदेश केले – प्रतापगडाची मोहिम, अफजल खानाचे पारिपत्य, पन्हाळ्याच्या वेढयातून सुटका, अश्या अनेक वेळी जिजाऊंचे उपदेश, मार्गदर्शन मोलाचे होते.

५) जेव्हा आग्र्यात महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेत होते तेंव्हा राज्याची सगळी सूत्रे जिजाऊंकडेच होती. मिर्जा राजेंबरोबर झालेल्या तहामुळे स्वराज्यातील द्यावे लागलेले सगळे किल्ले राजांनी आग्र्याहून सुटका करून घेताच परत जिंकले.. ह्या साठी लागणारे राजकारण हे जिजाऊंनी दिलेल्या बाळकडूमुळेच राजे खेळू शकले.

६) शत्रूला परास्त केल्यावर त्याचा उन्माद न करणे, इतिहासातील घटनांचा संदर्भ लक्षात घेऊन कोणत्याही क्षमतेच्या धर्म शत्रूवर दया / क्षमा न दाखवणे.‘मरणान्तानि वैराणि’ ही आपली संस्कृती असली तरी शत्रूच्या तथाकथित गुणांचे उदात्तीकरण करण्याची विकृती मात्र समाजात पसरणार नाही याचे काटेकोर पालन करणे… हे आणि असे अनेक राजकीय दृष्ट्या महत्वाचे नियम आऊसाहेबांनी शिवरायांसह त्यांच्या सवंगड्यांच्या अंगी भिनवले.

७) परकीय आक्रमकांनी उध्वस्त केलेली आपली धर्म, संस्कृती प्रतिके पुनः प्रतिष्ठापित करणे / त्यांचे संवर्धन-संरक्षण करणे जेणेकरून आत्मविस्मृत समाजास स्वाभिमानाची जाण होईल व स्वराज्य संरक्षण सर्वसमावेशक होईल… ह्या जिजाऊंच्या शिकवणीचा परिपाक म्हणजेच शिवरायांनी केलेला तुळजा भवानी सह अनेको मंदिरांचा जीर्णोद्धार!

८) ” हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा “ हे व्रत जगणाऱ्या शिवरायांना राज्याभिषेकाचे महत्व समजावणाऱ्या, ती वैयक्तिक महत्तेची गोष्ट नसून भारत भूमीसाठी एकछत्री राज्य असणे, प्रजेचे म्हणणे ऐकणारा प्रशासक असणे कसे आवश्यक आहे हे कळकळीने पटवणार्‍या माँ जिजाऊंना दूरदर्शी राजनितिज्ञच म्हणावे लागेल.

अशा या हिंदूभूमी उद्धार हेतूने ध्येय भारल्या, ध्येय जगल्या आणि ध्येय जेत्या माऊलीला सादर नमन!

Back to top button