CultureNewsSpecial Day

गोंदवलेकर महाराज

Shri Brahmachaitanya Maharaj Gondavalekar..

बालपण

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे होऊन गेलेल्या श्री ज्ञानेश्वरमहाराज, श्री तुकाराममहाराज, श्री समर्थ रामदास स्वामी व श्री एकनाथ महाराज आदि संताच्या मांदियाळीत शोभून दिसतील, अशा संतांपैकी एक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर! त्यांची जन्मभूमी म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे छोटेसे गाव. पण त्यांच्या जन्माने आणि वास्तव्याने आज महाराष्ट्रातच काय पण साऱ्या भारतातही ते पुण्यक्षेत्र म्हणून प्रसिध्द् आहे.

श्री महाराजांच्या घराण्यात पंढरीची भक्ति आणि वारी सात पिढ्या चालत आलेली होती. अशा या सात्त्विक कुटुंबात रावजी आणि सौ . गीताबाई या जोडप्याचे पोटी बुधवार माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स.१९ फेब्रुवारी १८४५) या दिवशी सूर्योदयाच्या सुमारास श्रीमहाराजांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा लिंगोपंत आणि सौ. राधाबाई यांना तर अत्यानंद झाला. पाळण्यात नाव गणपति असे ठेवले. हे गौरवर्णी गुटगुटीत आनंदी बाळ साहजिकच सर्वप्रिय झाले. बाळ थोडे मोठे होताच त्याच्या अंगचे अलौकिक गुण प्रकट होऊ लागले. भगवद्भजनाची अतोनात आवड, एकपाठीपणा, तसेच अन्नदानाचे अतीव प्रेम आणि दीनदुबळ्यांचा कळवळा पाहून आजोबा धन्य झाले.

पुढे योग्य वेळी मुंज झाल्यावर गणूने उपाध्यायांकडून त्यांची सारी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली. अध्यात्माची ओढ वाढतच होती, आणि अखेर नवव्या वर्षीच दोन सोबत्यांसह गणूने गुरुशोधार्थ घरातून पलायन केले . पण त्यांचा लवकरच शोध लागला आणि हा प्रयत्न विफल झाला. अकराव्या वर्षी गणूचा विवाह करण्यात आला . त्यानंतर लवकरच आजी व आजोबा दोघेही स्वर्गवासी झाले. पुढे योग्य वेळी मुंज झाल्यावर गणूने उपाध्यायांकडून त्यांची सारी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली.

इकडे गुरुभेटीची तळमळ वाढतच होती. त्यांच्या ठिकाणी जन्मत:च अत्यंत तीव्र अध्यात्म वृत्ती होती. व श्री एकनाथ व श्री समर्थ यांच्याप्रमाणे अगदी लहानपणापासून आपल्या जीवित कार्याची स्पष्ट जाणीव त्यांना होती. ब्रह्मज्ञानाचे आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. व अखेर, वयाच्या बाराव्या वर्षी आईला किंचितशी सूचना देऊन स्वारीने एके रात्री गुपचूप फक्त एका लंगोटीनिशी प्रयाण केले, आणि गुरुशोधार्थ भारतभ्रमण सुरु केले.

सद्गुरू शोध..

या भ्रमणात श्रीमहाराजांनी तत्कालीन बहुतेक संतांच्या भेटी घेतल्या. हरिपूर (सांगली) येथील साध्वी राधाबाई, मिरजेचे सत्पुरुष आण्णाबुवा, सटाण्याचे देव मामलेदार, अक्कलकोटचे श्रीस्वामी, हुमणाबादचे माणिक प्रभु, काशीचे तैलंगस्वामी, दक्षिणेश्वरचे श्रीरामकृष्ण परमहंस, आदि सर्वांनी अतिप्रेमाने त्यांना जवळ केले, पण ’तुझे गुरुपद माझेकडे नाही’ म्हणून सांगितले. अखेर गोदातीरी श्रीसमर्थसंप्रदायी श्रीरामकृष्ण यांनी दर्शन देऊन येहळेगांवच्या श्रीतुकारामचैतन्यांकडे जाण्यास सांगितले. तेथे गेल्यावर मात्र त्यांना पूर्ण समाधान झाले. नऊ महिने तेथे त्यांनी अविरत, अविश्रांत गुरुसेवा केली. गुरूंनी खडतर कसोट्या घेऊन त्यांची देहबुद्धि पूर्णपणे नष्ट झाल्याची खात्री करून घेतली, अखेर संतुष्ट होऊन अनुग्रह केला आणि ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले. मनासारखा सद्गुरु भेटल्यावर त्याने सांगितलेल्या मार्गाने जाऊन वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त करून घेतली. ’आत्मज्ञान अंगी मुरविण्यासाठी दोन वर्षे नैमिषारण्यात आत्मचिंतनासाठी जावे आणि मुख्य तीर्थक्षेत्र करून मग घरी जावे’ ही गुरुआज्ञा शिरसावंद्य करून ते निघाले.

गोंदवले..

श्री तुकामाईंच्या सांगण्याप्रमाणे तीर्थाटन करून ९ वर्षांनी गोंदवल्यास जाऊन घरी प्रकट झाले. सर्वांना आनंदीआनंद झाला. नऊ वर्षे आपली वाट पाहणाऱ्या पत्नीला ते माहेराहून घेऊन आले. पुढे तिच्यासह पुन: गुरुदर्शनास गेले, आणि नाशिक येथे सुमारे सहा महिने वास्तव्य करून त्यांनी तिची नामस्मरणात व ध्यानधारणेत उत्कृष्ट तयारी करून घेतली. वर्षभरानंतर तिला पुत्ररत्न झाले, पण लवकरच तो मुलगा देवाघरी गेला, आणि पाठोपाठ ती स्वत:ही वैकुंठवासी झाली. त्यानंतर काही काळाने आईच्या आग्रहाखातर त्यांनी पुन: विवाह केला, तो एका जन्मांध मुलीशी! यांना पुढे भक्तमंडळी ’आईसाहेब ’म्हणू लागली. पुढील काळात श्रीमहाराजांनी श्रीरामनामाचा प्रसार करण्याचे व सामान्य प्रापंचिकांना पेलेल असा परमार्थमार्ग दाखविण्याचे कार्य अधिकच जोराने केले. सदाचार, नामस्मरण, सगुणोपासना, अन्नदान आणि सर्वांबद्दल प्रेमभाव, यांवर त्यांचा विशेष भर होता.

सन १८९० पासून श्रींचे वास्तव्य प्रामुख्याने गोंदवले येथेच राहिले. त्यांच्याकडे येणा येणाऱ्यांची व राहणाऱ्यांची संख्या खूपच वाढली. या सर्वांना सगुणोपासनेला व सेवेला एक केंद्रस्थान असावे या हेतूने त्यांनी आपल्या वाड्यातच श्रीराम, सीता व लक्ष्मण, तसेच मारुती, यांची स्थापना केली. पुढे, भक्तमंडळींची संख्या आणखी वाढत गेल्यावर त्यांनी गावातच आणखी एक राममंदिर, एक दत्तमंदिर व एक धर्मशाळा’ बांधून निवासाची सोय वाढवली. पुढे एक शनिमंदिरही बांधले. शिवाय, जागोजागी उपासना वाढावी या हेतूने भक्तांना प्रेरित करून अन्य कित्येक गावी राममंदिरांची स्थापना केली. श्रीमहाराजांनी इ. स. १९०१ मध्ये मातु:श्री गीताबाई व अनेक भक्तमंडळी यांसह काशीयात्रेसाठी प्रयाण केले. त्यात त्रिस्थळी झाल्यानंतर गीताबाईंनी अयोध्येत देह ठेवला. इ. स. १८७६ व १८९६ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात श्रीमहाराजांनी आपल्या शेतावरच नाममात्र काम देऊन हजारो लोकांना अन्न पुरविले आणि उपासमारीपासून वाचविले.

कार्य आणि समाधी..

ब्रह्मस्वरूपी विलीन झालेले श्रीमहाराज हे पूर्णत्वाप्रत पोहोचलेले संत होते यात शंका नाही. देहबुद्धी मूळापासून जाळून टाकल्यामुळे त्यांच्या आचारात, विचारात आणि उच्चारात चुकून देखिल मी पणा व माझेपणा दिसायचा नाही, हेच त्यांच्या पूर्णत्वाचे गमक होय. अर्थात स्वत:बद्दल काहीच करायचे न उरल्यामुळे केवळ जगाचे कल्याण व्हावे एवढीच त्यांची भावना होती. आपण जो ब्रह्मानंद सेवन करतो तो सर्वांनी सेवावा व धन्य होऊन जावे या एकाच प्रेरणेने प्रभावित होऊन सर्व प्रकारच्या लोकांना त्यांनी जवळ केले. प्रपंचामध्ये परमार्थ कसा आणावा याचा ज्ञानकोश म्हणजे त्यांचे चरित्र!

प्रापंचिकाच्या प्रत्येक आध्यात्मिक शंकेचे उत्तर त्यांच्या चरित्रात सापडते. प्रापंचिक लोकांसाठी हा खटाटोप करीत असताना त्यांना अकारण निंदा, अपमान, छळ व कमीपणा सोसावा लागला. तरी देखील सर्वांनी भगवंताच्या मार्गी लागावे म्हणजे भगवंताचे नाम घ्यावे म्हणून शेवटचा श्वास असेतोपर्यंत त्यांनी प्रयत्न केला आणि केवळ जनहितार्थ आपले आयुष्य वेचून आणि सर्वस्व देवून असंख्य लोकांना भगवंताच्या नामाचा व प्रेमाचा महिमा पटवून दिला.

भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता श्रीमहाराजांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला. नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले, नामाच्या महत्त्वाचे त्यांनी जन्मभर गायन केले. आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचे महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालविले. श्रीमहाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले, कानांनी नाम ऐकले, वाणीने नाम घेतले, मनाने नाम कल्पिले, बुद्धीने नाम चिंतिले, काया वाचा मनाने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरे काहीच सत्य मानले नाही.

सोमवार, मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके १८३५, (इ.स.२२ डिसेंबर १९१३) या दिवशी, पहाटे ५.५५ वाजता ‘जेथें नाम, तेथें माझे प्राण, ही सांभाळावी खूण.’ हे शेवटचे शब्द उच्चारून, या महापुरुषाने आपला देह ठेवला. जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येऊ पहात असताना गोंदवल्याचा हा अध्यात्मसूर्य मावळला. वसिष्ठ, वामदेवादि भारतीय ऋषींची परंपरा चालविणारा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला.

Back to top button