News

दिवाळीला – किल्ला का करायचा!

दसरा संपून २-४ दिवस झाले नाही की २ गोष्टींची तयारी सुरु व्हायची. सहामाही परीक्षा आणि दिवाळी किल्ला. दिवाळीला किल्ला का करायचा हे मला शास्त्रीय दृष्टीने कधीच कळले नाही पण बहुदा मुलांनी फराळ बनवताना लुडबूड करू नये म्हणून कोणीतरी शोधून काढलेली ही नामी युक्ती असावी.

पण त्या दसऱ्यानंतरच्या १५ दिवसात अभ्यासाबरोबर लढाई चालू असताना मनात मात्र किल्य्याची तयारी चालू असायची. त्या २ आठवड्यात शाळेतून घरी येताना बरोबर रस्त्यात वेगवेगळे दगड दृष्टीस पडायचे. आणि मग गोलाकार दिसला की तो बुरुजासाठी, सपाट दिसला की राजांचं सिंहासन .. कुठे वाटेत बांधकाम चालू असेल तर लॉटरीच लागायची ..फरशांचे तुकडे पायऱ्या म्हणून दप्तरात , डब्ब्याच्या पिशवीत रोज घालून आणायचे. घरी आई-आजीचा रोज लाडिक ओरडा खायचा. या १५ दिवसात आम्ही एकमेकाशी भांडणारी भावंडे अगदी एकी मध्ये असायचो. आपले दगड कोणी चोरू नये म्हणून मग ते घमेल्यात घालून कॉट खाली ठेवायचे (आता ते दगड कोण चोरणार?… पण त्या वयात ते सगळं फार सिक्रेट असायचं)

मेन विषयाचे पेपर संपायचे आणि कार्यानुभव /चित्रकला असे २-४ पेपर राहिले असतानाच त्या किल्ल्याची पायाभरणी व्हायची. किल्ले बनवणं साधारण पहिलीपासून सुरु होतं पण ४थी मध्ये इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज येतात आणि मग पुढची ४-५ वर्ष किल्ले बनवायला एक जोश चढतो. त्या ४-५ वर्षात तोरणा,प्रतापगड, रायगड, जंजिरा हे बांधून झालेच पाहिजेत (नाहीतर बहुदा १० वी ला बसू देत नसावेत).

प्रतापगड म्हणजे मुख्य दगडाच्या साच्यातून बाजूला निघालेली एक निमुळती माची पाहिजे. रायगडावर बाकी काही नसले तरी एक टकमक टोक आणि एक हिरकणी बुरुज पाहिजेच. यात सगळ्यात ‘च्यालेंजींग’ म्हणजे जंजिरा कारण तो पाण्यात असणारा, त्यामुळे भोवतीचा खंदक इतका नीट पाहिजे की टाकलेलं पाणी २-३ तास तरी टिकून राहिलं पाहिजे. म्हणजे मग वाढवून आमचं पाणी ८-९ तास टिकत असं सांगता येतं.. जंजीरा बांधताना सगळं झालं की मग बाजूच्या बंगल्यातला एक अनुभवी दादा सांगणार की अरे खाली प्लास्टिक घाला मग त्यावर फरश्या टाका म्हणजे पाणी जास्त टिकतं …मग परत सगळं उकरा आणि बांधा (पण हे परत करायचा कंटाळा कधीच आला नाही). जंजिरा असेल त्या वर्षी हळूच आजीला लग्गा लावायचा की दर २ तासांनी थोडं -थोडं पाणी टाक. म्हणजे मग आपण खेळायला मोकळे आणि कोणीही मित्र आपल्या अपरोक्ष आपल्या किल्ल्यात खरंच ७-८ तास पाणी कसं टिकत पाहायला आला तर त्याला पाणी दिसलं पाहिजे म्हणजे आपली कॉलर ताठ. प्रत्येक किल्ल्याला एक चोर वाट असायचीच, ती खरं तर आम्ही मनात योजलेली पण चिखलाने गायब झालेली. पण तरीही ती आम्हा भावंडांना बरोबर दिसायची. बाकी घरातल्यांना ती शोधायला लावणे आणि आपण त्यांची परीक्षा बघणे हा एक आवडता खेळ. त्यांना सापडली नाही की आपण दाखवावी आणि घरातल्या मोठयांनी “अरे खरंच की” म्हणावं.

परीक्षा संपायच्या आणि दिवाळीला २-४ दिवस असायचे. ते ४ दिवस किल्ल्याला फिनिशिंग टच देण्यासाठी मग हात-घाईची लढाई व्हायची .. आता त्यात हळूहळू घरची सारी फौज सामील व्हायची. इतर वेळी काड्यापेटीशी अजिबात खेळू न देणारी आजी, एक आख्खी भरलेली काडेपेटी आणून द्यायची ..किल्ल्याचा वाटेवर दोन्ही बाजूनी लाव. मग आवडता उदयॊग …२-४ काड्या पेटवायच्या आणि हौस भागली की बाकीच्यांनी गडाची वाट अधोरेखीत करायची. शेजारच्या काकू किल्ल्यावर पेरायला मोहोरी किंवा हाळीव आणून द्यायच्या. कामाच्या गडबडीतून वेळ काढून आई डोकावून जायची. आईच ती …तिचं ते सहावं इंद्रिय, मुलांचं काय चाललंय हे तिला बरोबर सांगून असायचं. ती येऊन डायरेक्ट विचारायची .. “रायगड केलाय का .. ते टोक अगदी टकमक कड्यासारखं वाटतंय.. खरं तर तो किल्ला रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर काहीही होऊ शकला असता, पण त्या वयात आईने ओळखला म्हणजे आपला डिट्टो झालाय असं वाटून आमची छाती अभिमानाने भरून यायची. हेच ते प्रोत्साहन हे फार उशीरा कळलं!!

बाबांची तऱ्हा वेगळी ..कधी तरी येतील .. आणि विचारतील की या वर्षी कुठला “अंकाई” केला आहे वाटतं. “बाबा – नीट ओळखा ना”. “टंकाई” किल्ला केला आहे का? मग आपण चिडून सांगायचं बाबा एवढ ओळखू येत नाही ..त्याच्या कडे दुर्लक्ष करून मग बाबा आम्हाला माहित नसलेल्या कोणत्यातरी १-२ किल्ल्यांची ..त्याच्या इतिहासाची ..भूगोलाची माहिती सांगणार. नकळत ज्ञानदानाची ही त्यांची पद्धत.
त्या १०-१५ मिनिटांच्या बौद्धिकानंतर हळूच हातातील पिशवीतून २-३ मावळे, १-२ प्राणी, तोफा आमच्या सुपूर्द करणार!!
बरोबर आमचं मागच्यावर्षीचं काय तुटलंय हे बाबांना कसं कळायचं, का बाबा जे आणायचे तेच नेमकं आमचं तुटायचं हे अजूनही मला एक कोडं आहे!!

या गडबडीत वसुबारस उजाडायची.. दिवाळीचा पहिला दिवस. आज किल्ल्याचं ओपनिंग. संध्याकाळी ५ वाजता आजी हाक मारून सांगायची की तुमच्या किल्ल्यासाठी ही खास मोठी वात करून ठेवली आहे, रात्रभर पणती उजळवेल. हीच ती माया.
मग आई किल्ल्यापाशी एक छोटीशी रांगोळी काढायची. आणि त्याच वेळी हे सगळं इतक्या वेळ त्रयस्थपणे पहात आहेत असं वाटणारे आमचे आजोबा खराट्याच्या जाड किंवा कुंच्याच्या काडीला दोन भगवे कागदाचे त्रिकोण लावून त्यावर स्वतःच्या सुवाच्च अक्षरात ॐ, 卐 लिहून , किल्ल्यावर रोवायला भगवा ध्वज घेऊन यायचे. अरे हे आपण कसे विसरलो… यालाच अनुभव म्हणतात हे तेव्हा माहित नव्हतं.

मग घरादारात आणि किल्ल्यात पणती लागायची आणि किल्ला, घर आणि आमची मनेही उजळून निघायची!!

तेव्हा हे कधीच जाणवलं नाही पण आज कळतंय की दिवाळीतला किल्ला म्हणजे नुसता मातीचा डोंगर नव्हता. तर सगळ्या कुटुंबाला, संस्कारांना, संस्कृतीला अभेद्य ठेवणारा असा चिरेबंदी आणि चिरंजीवी तट होता तो! आज मला कळतंय की दिवाळीत किल्ला का करायचा.

साभार : साोशल मीडिया

Back to top button