NaxalismNews

नक्षलवादी चळवळ

“क्रांती घडवून आणण्यासाठी पोलादी शिस्तीचा पक्ष, जनसेवा आणि संयुक्त आघाडी या तीन जादूई हत्यारांची गरज असते. शस्त्रबळाद्वारे राज्यसत्ता हिसकावणे, युद्धाद्वारे तंटे सोडवणे हेच क्रांतीचे केंद्रीय काम व सर्वोच्च रूप आहे. जर तुम्हाला झाडावरच्या माकडांना घाबरवायचे असेल तर झाडाखाली कोंबड़ी कापा. आपसूकच ध्येय साध्य होईल. माओच्या या तीन वाक्यांत या देशात सुरू असलेल्या नक्षलवादी चळवळीचा इतिहास सामावलेला आहे. याच विचारांनी प्रेरीत होऊन या चळवळीने हा टप्पा गाठला. गेल्या ६ दशकात या चळवळीने काय कमावले आणि काय गमावले, यावर विचार करण्यासाठी या चळवळीच्या उगमावर नजर टाकणे अपरिहार्य ठरते.

नक्षलवादी चळवळीद्वारे काय साध्य केले यापेक्षा काय गमावले याची यादी मोठी ठरेल. आपल्या प्रभावक्षेत्राला सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारची विकास कामे ते त्या दुर्गम ठिकाणी येऊ देत नाहीत. परिणामी तेथील तरुणांना रोजगारासारखी आवश्यक गरज पूर्ण करता आली नाही. समाजाच्या प्रवाहात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना आपल्या दहशतीच्या जोरावर नक्षलवाद्यांनी वेठीस धरले आहे. तेथील सामान्य जनतेपासून ते राजकारण्यांपर्यंत त्यांची दहशत, त्यांच्या हिंसाचारामुळे पोहोचली आहे. ‘जनतेच्या भल्यासाठी उभारलेली चळवळ” या नावाने चालवलेली ही चळवळ माओचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे इथपासूनआपले राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यापर्यंत दिवास्वप्न पाहत आहे.

नक्षलवादाच्या या चळवळीने तिची ६ दशके पूर्ण झाल्यानंतरही लोककल्याणासाठी भक्कम असा पर्याय उपलब्ध करून देण्यात ही चळवळ सपशेल अपयशी ठरली आहे. गेल्या ६०वर्षांत नक्षलवाद्यांनी अतिहिंसाचारामुळे आपली विश्वासार्हता गमावली आहे. प्रारंभी त्यांच्यासोबत असलेले वनवासी नंतर त्यांच्यापासून दूर जाऊ लागले, चळवळीचा प्रभाव असलेल्या क्षेत्रातून होत असलेले लोकांचे स्थलांतर व शिक्षण तसेच नोकरीसाठी आग्रही असलेली तरुण पिढ़ी बघितली की, हा विश्वासार्हता गमवण्याचा मुद्दा आणखीनच स्पष्ट होतो. आपल्या प्रभावक्षेत्रातील लोकांवरील पकड ढिली होऊ नये म्हणून नक्षलवाद्यांनी मग हत्यासत्र वाढवले. त्यातून निर्माण होणाऱ्या दहशतीतून तरी लोक सोबत राहतील हा हेतू त्यामागे होता,पण झाले मात्र उलटेच.

जातीच्या नावाखाली माथे भडकवायचं काम हे माओ समर्थक आणि थेट माओ वादयांकडून केले जात आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा साम्यवादी विचारांना शेवटपर्यंत विरोध होता त्याच बाबासाहेबांच नाव सध्या हे माओवादी समर्थक शहरी भागात घेताना दिसत आहेत. शहरी भागातील युवकांचे माथे भडकवायची आणि त्यातून देशद्रोही घोषणा द्यायच्या आणि त्याच संविधानाचा वापर करून ते कसे निर्दोष आहेत हे सांगण्याचा कशोशीने प्रयत्नही करायचा.

हा देश लाखो भारतीयांच्या बलिदानातून उभा राहिलेला आहे. हजारो क्रांतीकारकांच्या त्यागातून हा देश स्वतंत्र झालेला आहे. शेवटपर्यंत प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाची अखंडता आणि देशाचे वैभव कसे टिकून राहील याबाबत अधिक जागरूक राहून येत्या काळात समाजात सामाजिक स्वास्थ्य व सुरक्षेसाठी अधिक तत्पर रहावे लागेल.

चला तर मग जाणून घेवूया नक्सलवाद्यांचा रक्तरंजित इतिहास..

Back to top button